लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सहा वर्षांपूर्वी आगीच्या घटनेनंतर बंद पडेलेले अंधेरी- मरोळ येथील ईएसआयसी कामगार रुग्णालय जानेवारी २०२६ पर्यंत कार्यान्वित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी ईएसआयसीला दिले. त्यापूर्वी, रुग्णालयाच्या सुशोभिकरणाचे काम करणाऱ्या नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने १५ ऑगस्टपूर्वी रुग्णालयाच्या इमारतीचा ताबा ईएसआयसीला देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

रुग्णालयाला १७ डिसेंबर २०१८ रोजी आग लागली होती आणि त्यात आठजणांचा मृत्यू झाला, तर १४५ रुग्ण जखमी झाले होते. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या मुलीचाही समावेश होता. घटनेनंतर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) रुग्णालयाची इमारत सील केली होती. त्यानंतर, करोनाची साथ आल्याने रुग्णालय पुन्हा सुरू केले नाही. परंतु, करोनाची साथ सरल्यानंतरही रुग्णालय कार्यान्वित केले नाही. त्यामुळे, रुग्णालय पुन्हा सुरू न करण्याचा डाव असल्याचा आरोप करून राजेश शर्मा यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. हे रुग्णालय बंद असल्याने मरोळ आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना उपचारांसाठी दूर जावे लागते, असा याचिकाकर्त्याने दावा केला होता.

तथापि, आगीच्या घटनेनंतर विविध कारणास्तव रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करणे शक्य होऊ शकले नाही. परंतु, ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे प्रयत्न असल्याचे ईएसआयसीतर्फे बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगण्यात आले. त्याचवेळी, २००८ मध्ये रुग्णालयाच्या इमारतीच्या सुशोभिकरणाचे काम नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनकडे देण्यात आल्याचेही ईएसआयसीने न्यायालयाला सांगितले, मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याची दखल घेतली. तसेच, नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने रुग्णालय इमारतीचे सुशोभिकरण आणि दुरूस्तीचे काम पूर्ण करून इमातीचा ताबा १५ ऑगस्टपर्यंत ईएसआयसीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. त्यानंतर, अग्निसुरक्षेसह आवश्यक त्या परवानग्या घेतल्यावर ईएसआयसीने जानेवारी २०२६ पर्यंत रुग्णालय पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

ईएसआयसीचा दावा काय होता ?

रुग्णालयाच्या सुशोभिकरणाचे काम २००८ मध्ये नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनकडे सोपवण्यात आले होते. खर्चाची रक्कम वेळेत जमा न केल्यामुळे हे काम रखडले होते. त्यातच, रुग्णालयाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू असताना १७ डिसेंबर २०१८ रोजी रुग्णालयाला आग लागली. या घटनेनंतर एमआयडीसीने रुग्णालयाचा सील ठोकले. ही कारवाई रद्द होऊन रुग्णालय पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा दावा ईएसआयसीने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला होता. रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी एमआयडीसीकडे ना हरकत मागण्यात आली. परंतु, करोनाची साथ आल्यानंतर सगळेच ठप्प झाले होते. त्यामुळे, पुढील काही काळ रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसली. परंतु, केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने २०२३ मध्ये रुग्णालयाचा बाह्यरुग्ण सेवा विभाग सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, एमआयडीसीकडे पुन्हा ना हरकत मागण्यात आली. ती मिळाल्यानंतर रुग्णालयाच्या सुशोभिकरण आणि दुरूस्तीचे काम नॅशनल बिल्डिंग्ज कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने सुरू केले. परंतु, खर्चामुळे त्याला विलंब झाला, असेही ईएसआयसीने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.

रूग्णालयातील सेवा अंशत: सुरूच

आगीच्या घटनेनंतर रुग्णालय बंद करण्यात आले. परंतु, रूग्णांची परवड होऊ नये याकिरता रुग्णांना कांदिवली येथील ईएसआयसी रुग्णालयात सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यातच, २०२३ मध्ये केंद्र सरकारच्या संबंधित विभागाच्या आदेशानंतर रुग्णालयात बाह्यरूग्ण सेवा विभाग सुरू करण्यात आला. तेथे येणाऱ्या गंभीर आजारांनी ग्रस्त किंवा आपत्कालिन परिस्थितीतील रुग्णांना कांदिवलीतील रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे, रूग्णालय पूर्णपणे बंद नाही, असा दावाही ईएसआयसीने न्यायालयात केला. त्याला अतिरिक्त सरकारी वकिलांनीही दुजोरा दिला.