मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव बासनात; शिवसेना व भाजपमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता
‘मेक इन मुंबई’साठी प्रयत्न करण्यात येत असताना शिवसेनेकडून देण्यात आलेला शहरात ‘रात्रजीवन’ सुरू करण्याचा प्रस्ताव मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बासनात गुंडाळून ठेवला आहे. मुंबईसह राज्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याचा दावा ते करीत असले तरी रात्रजीवनाचा प्रस्ताव मात्र सुरक्षेच्या कारणावरून शीतपेटीत बंद आहे. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता शिवसेना व भाजपमध्ये या मुद्दय़ावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील दुकाने, उपाहारगृहे व दैनंदिन व्यवहार २४ तास सुरू राहावेत, यासाठी ‘रात्रजीवन’(नाइटलाइफ)चा प्रस्ताव दिला होता. पोलीस आयुक्तांनीही त्यास संमती दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर मरीनड्राइव्ह किंवा दक्षिण मुंबईत काही भागांत हे करून पाहावे, असेही सुचविण्यात आले होते. त्यामुळे रोजगारनिर्मिती होईल आणि आर्थिक उलाढाल वाढेल, असा अंदाज आहे. पण रात्रजीवनावरून राजकारण झाले. रात्रजीवन म्हणजे उच्चभ्रूंसाठी रात्रभर बार उघडे ठेवण्याचा प्रस्ताव आहे, असा प्रचार झाला. त्यामुळे बस व रेल्वेस्थानकांवर अपरात्री उतरणाऱ्या प्रवाशांसाठी खाद्यपदार्थाचे स्टॉल व हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली. या मुद्दय़ावर बरेच आरोप-प्रत्यारोप झाल्याने सुरक्षेच्या कारणावरून हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला.
दुकाने, उपाहारगृहे रात्रभर सुरू राहिल्यास महिला व अन्य नागरिकांसाठी सुरक्षा पुरविणे शक्य नाही, असा अभिप्राय गृहविभागाने दिला आहे. मुंबईची तुलना शांघाय, सिंगापूर, लंडनशी झाली आणि जागतिक वित्तीय घडामोडींचे ते केंद्र व्हावे, असे सरकारचे प्रयत्न आहेत. बीकेसीमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. या परिस्थितीत जर मुंबईत कायदा व सुव्यवस्था सरकारला राखता येत नसेल, तर ‘मेक इन मुंबई’ला अर्थच उरणार नाही.
शिवसेनेचा आग्रह..
शहरात सीसीटीव्ही उभारणीचे काम सुरू असून दक्षिण मुंबईत बरेच काम झाले आहे. या पाश्र्वभूमीवरही शहरात पोलिसांना सुरक्षा देता नसेल, तर प्रश्नच आहे. उलट रात्रीही नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरू राहिल्यास वावर राहील आणि घरफोडय़ा व अन्य गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी होईल, असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे. पण राजकारणाच्या चष्म्यातूनच रात्रजीवनाचा विचार करण्यात येत आहे. ते सुरू करण्याचा निर्णय घेतला गेल्यास त्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता ते भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे शिवसेनेने दबाव आणल्यााशिवाय रात्रजीवनाबाबत लवकर निर्णय होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.