गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे युद्धपातळीवर साफसफाई हाती घेऊन मुंबई स्वच्छ करा. केवळ रस्तेच नव्हे तर गल्लीबोळही लख्ख करा, असे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंगळवारी पालिका अधिकाऱ्यांना दिले. मुंबईत २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली असून मुंबईकरांना समान वाटप होईल या दृष्टीने पाणीपुरवठय़ाचे नियोजन करावे, असेही आदेश त्यांनी दिले.
पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि खाते प्रमुखांची आढावा बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. मुंबईत लागू करण्यात आलेली पाणी कपात, साफसफाई, रस्त्यांची स्थिती आदींबाबत मेहता यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मुंबईमधील पदपथावर पथाऱ्या पसरणाऱ्या फेरीवाल्यांचा अनेकांना त्रास होत आहे. फेरीवाले मुंबईकरांना त्रासदायक ठरत असतील तर कोणाचीही गय करू नका. फेरीवाल्यांविरुद्ध सुरू असलेली कारवाई अधिक तीव्र करा, असे अजय मेहता यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

Story img Loader