राज्य सरकारने नववर्षांच्या स्वागतासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना तीन दिवसांसाठी पहाटे पाच वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू ठेवण्याची परवानगी दिल्याबद्दल आनंद व्यक्त करणारे हॉटेल मालक त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या हातात आल्या नसल्याने द्विधा मन:स्थितीत आहेत. नाताळचा सण एका दिवसावर येऊन ठेपला असताना पहाटेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एकाच केंद्रावर तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी हॉटेल संघटनांनी केली आहे.
नाताळचा सण आणि नववर्ष कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक देशी-परदेशी पर्यटकांची इथे गर्दी होते. पर्यटनाच्या दृष्टीने नवे धोरण आखण्यास उत्सूक असणाऱ्या राज्य सरकारने यानिमित्ताने २४ आणि २५ डिसेंबर तसेच ३१ डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण, पहाटे पाच वाजेपर्यंत काही वेगळे कार्यक्रम सुरू ठेवायचे असतील, खानपान सेवेसह मद्यपानाची सेवाही सुरू ठेवायची असेल तर पोलीस, उत्पादन शुल्क विभाग अशा विविध विभागांकडून परवानग्या मिळवाव्या लागतात. या परवानग्या हातात असल्याशिवाय आम्ही कार्यक्रम आयोजित करू शकत नाही. याचा आर्थिक फटका एकप्रकारे हॉटेल इंडस्ट्रीला आणि पर्यायाने सरकारलाही बसतो आहे. यामुळे महसूल कमी होतो, शिवाय पर्यटकही या नववर्षांच्या कार्यक्रमांचा आनंद लुटू शकत नाहीत. यासाठी सर्व विभागांनी वेगाने परवानग्या देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आणि या परवानग्या एकाच केंद्रावर दिल्या जाव्यात, अशी विनंती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया)चे अध्यक्ष भरत मलकानी यांनी केली आहे. हॉटेल मालकांना दरवर्षी या काळात द्विधा मन:स्थितीतून जावे लागते. त्यामुळे सरकारने नववर्षांच्या निमित्ताने या तीन दिवसांसाठी तात्कालिक परवानगी न देता हे दिवस कायमस्वरूपी निश्चित करून त्यासंदर्भातील परवानग्या आपोआप लागू होतील, अशा प्रकारे नियोजन केले. तसेच या परवानग्या एकाच केंद्रावर उपलब्ध करून दिल्या तर हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना अधिक नियोजनपूर्वक काम करता येईल, अशी अपेक्षाही हॉटेल संघटनांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader