उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) संदर्भात योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत जकात कर लागू करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात बोलताना केली. त्याचवेळी व्यापाऱ्यांनी बंद करून जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे, असे सांगत त्यांनी या आंदोलनास विरोध केला.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा तसेच कक्ष सुरू करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यासाठी उद्धव ठाकरे हे मंगळवारी ठाण्यात आले होते.

‘स्थानिक संस्था करामुळे महापालिकेच्या तिजोरीत जकात करासारखे दररोज पैसे येणार नाहीत. त्यामुळे कोणताही थातूरमातूर तोडगा काढू चालणार नाही. त्यासाठी सर्वाना एकत्र आणून या कराविषयी चर्चा करायला हवी. तसेच या करासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत जकात कर लागू करावा,’ असे ते म्हणाले.

भाजप अधिक आक्रमक

राज्य शासनाने एलबीटी हा जुलमी कर तातडीने रद्द करावा, अन्यथा त्याविरुध्दच्या आंदोलनात तुरुंगात जाण्याचीही माझी तयारी असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी येथे केले. व्यापाऱ्यांचा संप गेले काही दिवस सुरू असताना सरकारने टोकाची भूमिका घेतली असून व्यापार ठप्प आहे. सरकारचे सुमारे ४०० कोटी रुपये बुडत असून चार लाखाहून अधिक नोकर, मजूर, हमाल यांच्या रोजीरोटीचे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने एलबीटी रद्द करुन त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, यासाठी व्यापारी, विरोधी पक्ष व संबंधितांची समिती नेमावी, असे मुंडे यांनी सांगितले. 

Story img Loader