काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी ठाणे जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागातील पालघरमध्ये एका विकासाभिमुख कार्यक्रमासाठी आणून जिल्ह्य़ावर आपली मांड घट्ट बसविण्याचे बिगूल काँग्रेसने वाजविले. कोणत्याही क्षणी होणाऱ्या आगामी निवडणुकांचा विचार करून करण्यात येणाऱ्या या खेळीचा आणखी भाग म्हणजे ठाणे जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते ‘ठाणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (टीएमआरडीए) स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली पडद्यामागून करीत आहेत.
२३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कल्याण-डोंबिवलीत दिवसभराच्या कार्यक्रमांसाठी आले होते. या वेळी काँग्रेस मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या कमजोर ताकदीविषयी खंत व्यक्त केली होती. ही ताकद वाढविण्यासाठी शहरी भागाबरोबरच आदिवासी भागात काँग्रेसने आपले पाय रोवणे कसे गरजेचे आहे याविषयी सूतोवाच केले होते. हाच धागा पकडून चव्हाण श्रेष्ठींसमोर ठाणे जिल्ह्य़ाची काँग्रेसची लंगडी बाजू आणि ती सुदृढ करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सांगण्यात यशस्वी ठरले. नेहमीच आदिवासींसाठीचे उपक्रम राबविण्यासाठी नंदुरबार
जिल्ह्य़ाची निवड करणाऱ्या काँग्रेसने या वेळी श्रेष्ठींचे पाय ठाणे जिल्ह्य़ाच्या आदिवासी भागात लावण्यात पुढाकार घेतला.
ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेसचा फक्त एक आमदार आणि एक खासदार आहे. २४ आमदारांची ताकद असणारा, आगामी काळात राज्याचा मुख्यमंत्री ठरविणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेसची ताकद एवढी कमजोर राहणे पक्षाला घातक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ‘बाबां’नी हायकमांडना विश्वासात घेऊन, स्वत:चे कर्तृत्व उठवून दाखविण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे. अनेक वर्षे बहुतांशी पालिका, पंचायत समित्या  शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादीची ताकद या भागात भक्कम आहे. या दोन्ही पक्षांना जकातीमुळे हे ‘बळ’ मिळत असल्याची खात्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना झाल्याने बाबांनी प्रथम जकात रद्द करण्याचे धोरण अवलंबले. या पुढील काळात ठाणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना, पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्य़ांची निर्मिती, विकासाची गंगा या भागात आणणे, अशा माध्यमांतून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसेना-भाजप, राष्ट्रवादीच्या सत्तांना शह देण्यासाठी ‘टीएमआरडीए’ ही समांतर यंत्रणा आक्रमकपणे शासन पातळीवरून राबवून हळूहळू विरोधकांच्या सत्तांना कमजोर करण्याची खेळी काँग्रेसकडून राबविण्यात येईल, असे विश्लेषकांकडून सांगण्यात येते.
पृथ्वीराज बाबांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व खेळी यशस्वी व्हाव्यात व काँग्रेसला ‘बलवान’ करण्यासाठी आदिवासी विकासमंत्री राजेंद्र गावीत, आमदार संजय दत्त, आमदार मुझफ्फर हुसेन यांची फळी या भागात कायमस्वरूपी तैनात ठेवायची व्यूहरचना काँग्रेसकडून आखण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.  
विकासाभिमुख ठाणे जिल्ह्य़ासाठी
* स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर ‘टीएमआरडीए’ हेही नियोजन प्राधिकरण.
* सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकच विकास नियंत्रण नियमावली.
* वाहतुकीचे एकत्रीकरण.
* विकासाभिमुख भागात रोजगार, उद्योगनिर्मितीसाठी अर्थसाहाय्य.
* विकासासाठी विशेष चटई क्षेत्र निर्देशांक.
* उद्योगांना भरघोस सवलतींचे पॅकेज.
* रस्ते, उड्डाण पुलांचे जाळे उभारणे.
* एलबीटीचे खासगीकरण नाही.
* एकच सेवा भरती नियम.
* निष्क्रिय आयुक्तांच्या जागी पालिकांमध्ये आयएएस अधिकारी नेमणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा