दादर परिसरातील बाजारामुळे विद्यार्थ्यांना त्रास
दादर स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूला छबिलदास गल्लीत गणेशोत्सव काळात विकली जाणारी आकर्षक मखरे गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत असली तरी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ती त्रासदायक ठरू लागली आहेत. विनापरवाना, एकमजल्यापर्यंतची शेड उभारून, दाटीवाटीने उभा राहणारा हा मखरांचा बाजार येथील जुन्या व नामांकित अशा छबिलदास शाळेला अगदी लागून लावला जात असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करणे कठीण झाले आहे, शिवाय त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेशोत्सव काळात बहुतांश मखर विक्रेते छबिलदास शाळेला तिन्ही बाजूने वेढून आपली दुकाने थाटून बसतात. गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीपासूनच साधारणपणे ५० ते ६० मखरवाल्यांचा शाळेला गराडा पडतो. यामुळे शाळेची सुरक्षा तर धोक्यात येतेच, परंतु शाळेत येण्या-जाणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचीही गैरसोय होते. शाळेच्या भिंतींना खेटून उभ्या राहणाऱ्या मखरांच्या शेड इतक्या उंच असतात की, शाळेच्या पहिल्या मजल्यापर्यंतच्या खिडक्याही त्यामुळे झाकल्या जातात.
दरवर्षी शाळा या मखरवाल्यांविरोधात महापालिकेकडे तक्रार करते. अधेमधे काही विक्रेत्यांवर कारवाईही होते. परंतु विक्रेत्यांचा गराडा पुन्हा पडतो. परिणामी परिस्थिती जैसे थेच आहे. या वर्षीही आम्ही पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे याची लेखी तक्रार केली आहे, असे छबिलदास शाळेच्या जनरल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी लोकसत्ताला सांगितले.
दोन आठवडय़ांपूर्वी दादरमधील प्रधान मेन्शन इमारत परिसरातील मखराच्या तात्पुरत्या शेडला आग लागली होती. त्यामुळे मखर बाजाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आगीत या इमारतीचे बरेच नुकसान झाले. प्रधान मेन्शनच्या शेजारीच चिंचोळी गल्ली सोडून छबिलदास शाळा आहे. तिथे तर अध्र्याहून अधिक मखरवाल्यांचा शाळेच्या इमारतीला गराडा पडलेला असतो. ही मखरे बऱ्याचदा थर्माकोल, पुठ्ठे असा ज्वलनशील साहित्यापासून बनविलेली असतात. त्यामुळे यातील एका जरी शेडमध्ये अशी दुर्घटना घडली तर काय, असा सवाल करत या परिसरात राहणाऱ्या शाळेच्या एका माजी विद्यार्थ्यांने या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. छबिलदास गल्लीही इतकी चिंचाळी आहे की, गणेशोत्सव काळात या ठिकाणी वाहन नेणे तर सोडाच साधे चालणेही शक्य नसते.
याबाबत जी उत्तरचे पालिका सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांच्याशी संपर्क साधला असता शाळेकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, असे स्पष्ट केले. मात्र, बेकायदेशीर आणि विनापरवाना विक्रेते पदपथ आणि रस्ते अडवून आपल्या मालाची विक्री करताना आढळून आले तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.
केवळ मखर विक्रेतेच नव्हे तर दादरमधील फेरीवाले हा या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांकरिता आणि स्थानकात येणाऱ्या प्रवाशांकरिता त्रासाचा विषय ठरतो. स्थानक परिसराच्या आजूबाजूला अनेक निवासी इमारतींमध्ये फेरीवाल्यांचा माल साठवून ठेवलेला असतो. या विषयी आणि अनधिकृत फेरीवाल्यांविषयी दादरमधील फ्रेण्डस् ऑफ दादर या संस्थेने पालिकेकडे वारंवार तक्रारही केली आहे, परंतु त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.
– श्रीराम पाध्ये, सदस्य, फ्रेण्डस् ऑफ दादर