मुंबई : नेत्यांच्या वाहनांना जागा करून देण्यासाठी परिसरात रस्ते बंद करून नका, सह्याद्री अतिथी गृह आणि वर्षा बंगल्यावर होणाऱ्या राजकीय बैठका मंत्रायलात घ्या अशा स्वरुपाच्या मागण्या मलबार हिल येथील रहिवाशांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांमुळे परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच शिंदे यांच्याबरोबरच शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्याविरोधातही नागरिकांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांना आता ठाकरे सेनेचा उमेदवार जवळचा वाटू लागला आहे.
मुंबईतील सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबार हिल परिसरात मात्र वाहनतळाच्या विषयावरून नागरिक संतापले आहेत. या परिसरातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर आपला जाहीरनामा तयार केला आहे. या जाहीरनाम्यात मलबार परिसरातील विविध प्रश्नांसंबंधी मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पर्यावरण, प्रदूषण हे विषय मुख्यत्वे घेण्यात आले असून त्यानंतर वाहनतळाचा मुद्दा मांडण्यात आला आहे.
हेही वाचा…घाटकोपरमध्ये कोसळलेल्या होर्डिंगविषयी BMC चा मोठा खुलासा; परवानगी कुणी दिली, खरा दोष कुणाचा?
यामिनी जाधव यांची अनुपस्थिती
दक्षिण मुंबईत महायुतीतर्फे शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अरविंद सावंत उभे आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याच दोन उमेदवारांमध्ये ही लढाई होणार आहे. मलबार हिल हा परिसर भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून त्यांना यावेळी शिवसेनेच्या दोन उमेदवारांमधून एक उमेदवार निवडावा लागणार आहे. मात्र मलबार हिलच्या रहिवाशांनी आपला जाहीरनामा देण्यासाठी यामिनी जाधव आणि सावंत यांना निमंत्रण दिले असता जाधव यांनी प्रतिसाद दिला नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तर अरविंद सावंत यांनी मात्र रविवारी कमला नेहरू उद्यानात रहिवाशाची भेट घेतली. त्यामुळे भाजपच्या या मतदारांमध्ये उमेदवाराबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
जाहीरनाम्यात मागण्या कोणत्या?
चांगले रस्ते, पदपथ, वाहनतळाची सुविधा, मलबार हिलमधील हिरवाई टिकवावी, मलबार हिल जलाशय जतन करावे, हॅगिंग गार्डनला धक्का लावू नये, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना कठोर दंड करावा. लोकप्रतिनिधींच्या निधीचा वापर सोयीसुविधांसाठी करावा, सुशोभिकरणासाठी नको. पाणी, रस्ते, कचऱ्याच्या तक्रारींसाठी ऑनलाईन सुविधा हवी.
हेही वाचा…मुंबई : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या १४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन निवासस्थाने या परिसरात आहेत. सह्याद्री अतिथीगृहावरही बैठक होत असते. त्यामुळे हा परिसर मंत्र्यांच्या ताफा, कार्यकर्त्यांच्या गाड्या यांनी व्यापलेला असतो. रहिवाशांच्या गाड्या उभ्या करण्यास मनाई केली जाते. कार्यकर्ते या परिसरात दादागिरी करतात. त्यामुळे आम्हाला अत्यंत त्रास होत असून यावर आम्हाला तोडगा हवा आहे. – बिना भाटीया, मलबार हिल रहिवासी
पेडररोड, अल्टामाऊंट रोड, वॉर्डन रोड, बी जी खेर मार्ग, नेपियन्सी रोड येथील उच्चभ्रू रहिवाशांच्या समस्या सारख्याच आहेत. हा जाहीरनामा या सर्व रहिवाशांचा आहे. आम्ही हा जाहीरनामा अरविंद सावंत यांच्याकडे दिला आहे. – प्रकाश मुन्शी, सामाजिक कार्यकर्ते, मलबार हिल रहिवासी संघटना