Malabar Hill walkway elevated nature trail Entry charges : दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथे निसर्ग उन्नत मार्ग (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) तयार करण्यात आला असून रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते हे लोकार्पण पार पडले. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी देखील उपस्थित होते. दरम्यान मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर रपेट मारण्यासाठी पर्यटकांना ऑनलाईन पोर्टलवरून एक तासासाठी स्लॉट बूक करावे लागणार आहेत. तसेच त्यांना तिकीट देखील खरेदी करावे लागणार आहे.

या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून तब्बल चार वर्षांनी हा मार्ग सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. महापालिकेने माहिती दिली की, या मार्गाचा वापर एकावेळी फक्त २०० लोकच करू शकणार आहेत. तसेच पर्यटकांना एका तासासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून स्लॉट बुक करता येणार आहेत.

स्लॉट कुठे बुक कराणार?

दरम्यान या मार्गावर गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेने रविवारी ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणाली देखील सुरू केली आहे. ज्याच्या माध्यमातून या मार्गावर एका वेळी २०० जणांना प्रवेश दिला जाईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका पर्यटकांना एक तासाचा स्लॉट देणार आहे. तसेच पर्यटक त्यांचा स्लॉट https://naturetrail.mcgm.gov.in/ या पोर्टलवर जाऊन बुक करू शकतात.

नोंदणी केल्यानंतर ऑनलाईन तिकीटावर एक बारकोड जनरेट केला जाईल, ज्याद्वारे प्रवेश आणि बाहेर पडणे नियंत्रित केले जाईल. पर्यटकांच्या भेटीची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली (एक्सेस कंट्रोल सिस्टिम ) विकसित करण्यात आली आहे.

तिकीट किती आहे?

दरम्यान या मार्गावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांकडून २५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल तर परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल.

सिंगापूर येथे विकसित ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा उन्नत मार्ग मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. या निसर्ग उन्नत मार्गाची लांबी एकूण ४८५ मीटर आणि रूंदी २.४ मीटर इतकी आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ‘सी व्हिविंग डेक’ देखील बांधण्यात आला आहे.