मुंबई : कॅनडाचा वर्क व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४० हून अधिक जणांची सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मालाडमधील ४६ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून रिना शहा आणि गौरव शाह यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तक्रारीनुसार मे २०२३ ते जून २०२४ दरम्यान रिना आणि गौरवने ४० लोकांची एक कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार महिलेला कॅनडाला जाऊन तिथे काम करायचे होते. शहा दाम्पत्याने कॅनडाचा वर्क व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन तिला दिले होते. व्हिसा अर्जासाठी प्रक्रिया शुल्काच्या बहाण्याने आरोपींनी तक्रारदार महिलेकडून ७ लाख १६ हजार रुपये घेतले. पण तिला वेळेत व्हिसा मिळाला नाही. त्याबाबतच विचारणा केली असता आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. तक्रारदार महिलेने तपासणी केली असता त्यांनी अन्य काही व्यक्तींची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिना आणि गौरव यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ (विश्वासाचा भंग), ४२० (फसवणूक) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा…CNG PNG Prices in Mumbai : मुंबईत सीएनजी-पीएनजीचे दर वाढले, रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार?

व्हिसा देणाऱ्या संस्थेमुळे हा प्रकार झाल्याचा दावा आरोपींनी तक्रारदारांसमोर केला आहे. मात्र पोलिसांना त्यांचा दावा खरा वाटत नसून याप्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींचे बँक खाते कोण हाताळत आहेत, त्यांचे लाभार्थी कोण आहेत, त्याचा तपशील मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. तक्रारदारांना काही कागदपत्रेही देण्यात आली आहेत. सध्या त्यांच्या सत्यतेबाबत पडताळणी सुरू आहे. कागदपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास खोटे कागदपत्र बनवून फसवणूक केल्याचे कलमही याप्रकरणी वाढवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी मालाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा…Hit and Run Case : अपघातानंतर महिलेला दीड किमी नेलं फरफटत अन् अंगावर…! CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

समाज माध्यमांचा वपार

आरोपींनी समाज माध्यमांचा वापर करून ऑनलाइन मीडिया सेंटर सुरू केले होते. तेथे नागरिकांना त्यांच्या अर्जांचे पुनरावलोकन आणि स्थिती पाहता येत होती. पण फसवणुकीचा प्रकार उघड होताच हे ऑनलाई मीडिया सेंटर बंद करण्यात आले. आतापर्यंत ४० तक्रारदारांची ओळख पटली असून त्यापैकी २५ हून अधिक जणांनी तक्रारीही केल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malad couple accused of defrauding 40 people of more than 1 crore in visa scam mumbai print news psg
Show comments