मुंबई : मालाड व कांदिवली पश्चिम भागात येत्या मंगळवारी चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० पासून मंगळवार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मालाड (पश्चिम) विभागातील मालवणी प्रवेशद्वार क्रमांक १, राधाकृष्ण हॉटेल समोर मार्वे मार्ग येथे नव्याने घातलेल्या ७५० मिलीमीटर व अस्तित्वात असलेल्या ६०० मिलीमीटर व्यासांच्या जलवाहिन्यांच्या जोडणीचे व ६०० मिलीमीटर मध्यवर्ती झडप बसविण्याचे काम सोमवारी रात्री १० वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत म्हणजे सोमवारी रात्री १० वाजेपासून मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत मालाड (पश्चिम) विभागातील मढ, मालवणी, जनकल्याण नगर, मनोरी, गोराई तसेच कांदिवली (पश्चिम) या विभागातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि न्यू म्हाडा परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनान केली आहे.