मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड मनोरी येथील रस्त्यांकडे मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून या रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले आहे. या रस्त्यावर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बसगाड्या रुतून बसण्याच्या घटना गेल्या आठवड्यात दोनदा घडल्यामुळे बससेवा देणाऱ्या कंपनीने मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे मुंबई महानगरपालिकेची तक्रार केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबई महानगरपालिकेची अक्षरशः लाज गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालाड येथील मनोरी हे मुंबई शहरापासून जवळच पण तरीही सोयी सुविधांपासून लांब राहिलेले बेट आहे. या बेटावर उत्तनपर्यंतच्या भागात सेवा देण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. मात्र मनोरीत गेल्या अनेक वर्षांपासून सोयीसुविधा पोहोचलेल्याच नाहीत. या ठिकाणी असलेल्या रस्त्यांचीही दूरवस्था झाली आहे. महापालिकेने या ठिकाणी रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे काम हाती घेतलेले असले तरी पावसाळ्यात अर्धवट काम करून थांबवण्यात आले आहे. पण त्यामुळे येथील नागरिकांना आणि वाहनचालकांना त्रास सोसावा लागतो आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम झाले आहे आणि अर्धा रस्ता मातीचा व चिखलाचा असल्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. तसेच पर्जन्यजलवाहिन्यांचेही काम केलेले नसल्यामुळे अर्ध्या रस्त्यावर गुडघाभर पाणी असते. या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही.

हेही वाचा…नेरुळमध्ये आढळलेल्या दुर्मीळ सागरी पक्ष्याचा मृत्यू

भाईंदरमधील उत्तन नाका ते मनोरी तलावापर्यंत मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बगगाड्या येत असतात. मात्र मनोरीतील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे बसगाड्या रस्त्यात अडकून पडण्याच्या घटना गेल्या आठवड्यात दोनदा घडल्या. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे व माती, चिखल यामुळे बसचे ब्रेक नीट लागत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, असे पत्र मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी बससेवा देणाऱ्या महालक्ष्मी सिटीबस ऑपरेटर संस्थेने मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला याबाबत सांगून तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा या मार्गावरील बसगाड्या बंद कराव्या लागतील असाही इशारा या पत्रात बससेवा देणाऱ्या संस्थेने दिला आहे.

हेही वाचा…७५ वर्षापासूनची बेस्ट उपक्रमाची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर, बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाचवण्यासाठी ‘बेस्ट बचाओ’कडून पुढाकार

दरम्यान, या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचे सूचना देणारे फलकही न लावल्यामुळे रहिवाशांमध्येही नाराजी आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात येथील रहिवाशांनीच वाहनचालकांना सूचना देणारे फलक लावल्याची माहिती येथील रहिवासी स्वीट्सी हेनरी यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malad manori roads in poor condition mira bhayander municipal corporation bus service complains to bmc mumbai print news psg