हिरवळ.. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी! मात्र शहरात हिरवळ सापडणार तरी कुठे? चहूबाजूनी सीमेंट-काँक्रीटचे जंगल असल्याने हिरवळ नावालाच दिसते. मात्र शहरातील अशी काही उद्याने आहेत, ज्या आपला हिरवा वसा जपून ठेवतात. मालाड-गोरेगावमधील ‘माइंड स्पेस गार्डन’ हे त्यापैकीच एक. जमिनीवर हिरवा गालिचा पसरावा, तसे हे उद्यान भासते. मनमोहक आणि मन उल्हासित करणारे हे एक अनोखे उद्यान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालाडमध्ये लिंकिंग रोडजवळ इनॉरबिट मॉलच्या मागे हिरवाईनी नटलेली दोन उद्याने आहेत. दोन्ही उद्याने लहान मुलांसाठी आणि तरुणाईसाठी वेगळी अनुभूती देणारी. त्यापैकीच एक असलेले ‘माइंड स्पेस गार्डन’ हे नावाप्रमाणेच मनातील एखादा हिरवा कोपरा जागवते. एका टेकडीसारखे दिसणारे हे उद्यान ‘चिंचोली कचराभूमी’वर भर टाकून तयार केलेले आहे. जणू कचऱ्यातून स्वर्ग निर्माण केला.

या उद्यानाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे असलेली भन्नाट हिरवळ. जमिनीवर हिरवा गालिचा पसरावा, त्याप्रमाणेच ही हिरवळ भासते. ही हिरवळ पाहून थकलेले मनही उल्हसित होते. या हिरवळीवर बागडावे, तिथे निवांत पडावे असे वाटते. या हिरवळीच्या मध्ये तयार करण्यात आलेला जॉगिंग ट्रॅक, चालण्यासाठी रस्ताही आकर्षक वाटतो. हिरवळीतून वाट काढणारी पाऊलवाट जणू. या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेली पाम ट्री, बांबूची झाडे, विविध रंगीबेरंगी फुलझाडेही मनमोहक वाटतात.

काही एकरात पसरलेल्या या निसर्गरम्य उद्यानात विविध प्रकारची सुमारे २००० झाडे आहेत. त्यापैकी बहुतेक झाडे बांबू आणि खरपत्री या प्रकारातील. उद्यानाला शोभा यावी यासाठी याच प्रकारातील झाडांची लागवड करण्यात आली. जॉगिंग ट्रॅकच्या एका बाजूला आकर्षक फुलझाडे आणि दुसऱ्या बाजूला बांबूची झाडे अशी रचना आहे. भव्य हिरवळीच्या मधोमध विराजमान झालेल्या या ट्रॅकवरून चालणेही आकर्षक आणि रमणीय वाटते. येथील हवा आल्हाददायक असल्याने शरीरातील आणि मनातील थकवा कधीच निघून गेलेला असतो. लहान मुलांना तर येथे बागडायला खूपच आवडते. त्यांच्यासाठी उद्यानात काही खेळण्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उद्यानात पाण्याचा एक लहानसा ओहोळ असून, त्यावर बांधण्यात आलेला पूल तर छायाचित्र काढण्यासाठीची उत्तम जागा. अनेक तरुण-तरुणी या पुलावर ‘सेल्फी’मग्न होतात.

मुंबईतील इतर परिसरापेक्षा येथील तापमान काही अंशांनी कमी असते. आजूबाजूला वनराई आणि तापमान कमी यामुळे येथे नैसर्गिक थंडावा जाणवतो. शहरी वातावरणाला छेद देणारे हे उद्यान मन उल्हसित करणारे आहे.. मनातील हिरवा कोपरा जागवणारे!

कसे जाल?

माइंड स्पेस गार्डन, मालाड

  • मालाड आणि गोरेगाव या स्थानकाबाहेरून रिक्षा किंवा टॅक्सी करून या उद्यानापर्यंत जाता येते. लिंकिंग रोडवर असलेल्या इनॉरबिट मॉलजवळ हे उद्यान आहे.
  • वेळ : सकाळी ६.३० ते ११. आणि संध्याकाळी ४.३० ते ९.३०.
  • शुल्क : प्रत्येकी पाच रुपये.