मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर येथील वसाहतीत २०१९ मध्ये संरक्षक भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला तीन वर्षे झाली, तरी तेथील सर्व रहिवाशांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. एकूण १५५ झोपडीधारकांपैकी ७३ झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. वनखात्याच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसन रखडल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून रहिवासी येथे राहत आहेत.
मालाड भिंत दुर्घटना : मृतांचा आकडा २६ वर पोहचला
मालाड पूर्वेकडील आंबेडकर नगर व पिंपरी पाडा परिसरात मालाड जलाशयाचे रक्षण करण्यासाठी पालिकेने बांधलेली २.३ किलोमीटरची भिंत १ जुलै २०१९ रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने ढासळली. भिंतीच्या मागे जमा झालेले पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरले. त्याचबरोबर भिंतीखाली अनेक झोपड्या दबल्या गेल्या तर अनेक वाहून गेल्या. या घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला, तर १३० हून अधिक जण जखमी झाले होते.
पालिका व वनखाते या दोन प्राधिकरणांमध्ये वादही रंगला होता –
पालिकेने या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. तसेच या दुर्घटनेनंतर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली. वनखात्याच्या जमिनीवर या झोपड्या असल्यामुळे पालिका व वनखाते या दोन प्राधिकरणांमध्ये वादही रंगला होता. त्यावेळी प्रशासनाने १५५ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते. परंतु ८२ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आणि ७३ झोपडीधारकांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही.
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन –
उर्वरित नागरिकांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे मालाडमधील माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांच्यासह भाजपाच्या माजी नगरसेवकांनी स्थानिक नागरिकांसह महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.