मुंबई : शहरात ऑगस्टमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे हिवतापाचा(मलेरियाचा) आणि लेप्टोचा प्रादुर्भाव आणखीनच वाढला आहे. शहरातील बांधकामाच्या ठिकाणी पावसाचे साचलेले पाणी प्रामुख्याने मलेरियाच्या वाढीस कारणीभूत ठरत आहे.
जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये २६५ने मलेरियाची रुग्णसंख्या वाढली असून एकूण १,११७ रुग्णांची नोंद झाली आहे, तर लेप्टोच्या रुग्णांची संख्या १४ वरून ४५ वर गेली आहे. मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी ५४५ रुग्ण ऑगस्टमधील शेवटच्या पंधरवडय़ात आढळले. लेप्टोच्या ४५ पैकी २९ रुग्णांची नोंद ही याच काळात झाली आहे. मलेरियामुळे ऑगस्टमध्ये दोन मृतांची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मलेरियाचे ८२४ रुग्ण आढळले होते, तर लेप्टोचे ४५ रुग्ण नोंदले गेले. गेल्या वर्षांच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांची संख्या अधिक आहेच, परंतु लेप्टोची रुग्णसंख्या किंचित कमी झाल्याचे दिसून येते.
शहरातील बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचल्याने येथे मलेरियाच्या डासांच्या अळ्यांची उत्पत्तीस्थाने अधिकतर आढळली आहेत. त्यामुळे या भागांमध्ये सर्वेक्षण आणि कार्यरत कामगारांच्या चाचण्यांवर अधिक भर देण्यात येत आहे. तसेच रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागांमध्ये मलेरियाच्या शीघ्र प्रतिजन चाचण्यांची संख्या वाढविली आहे.
अन्य आजारांमध्ये घट
जुलै महिन्याप्रमाणेच मलेरिया आणि लेप्टो वगळता अन्य पावसाळी आजारांचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेने फारच कमी आहे. ऑगस्टमध्ये स्वाइन फ्लू (१), कावीळ (१०), अतिसार (५३), डेंग्यू (१०) रुग्ण आढळले आहेत.
ऑगस्टमधील पावसाळी आजारांची स्थिती
ऑगस्ट २०१९ ऑगस्ट २०२०
आजार संख्या मृत्यू संख्या मृत्यू
मलेरिया ८२४ ० ११३७ २
लेप्टो ४९ २ ४५ ०
स्वाइन फ्लू ३६ १ १ ०
अतिसार ६२३ ० १ ०
कावीळ १४७ ० १० ०
डेंग्यू १३४ ० १० ०