गतवर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या दुप्पट

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेचे सर्व विभाग झटत असताना मलेरियाने आरोग्य यंत्रणेला कोंडीत पकडले आहे. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत मलेरियाच्या (हिवताप) रुग्णांची संख्या दुपटीने वाढली असून पावसाळय़ापूर्वी आणि पावसाळय़ात केले जाणारे सर्वेक्षण योग्य पद्धतीने न झाल्याने ही रुग्णसंख्या वाढल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, २०१७ पासून प्रथमच मुंबईतील मलेरियाच्या रुग्णसंख्येने ८०० चा टप्पा पार केला आहे.

दरवर्षी लेप्टोस्पायरोसिस, स्वाइन फ्लू, डेंग्यूमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण मात्र या वर्षी शून्यावर आल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून निदर्शनास येते. जुलैमध्ये शहरात हिवतापाचे ८७२ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी याच महिन्यात ४३८ रुग्णांची नोंद आहे. २०१७ मध्ये जुलैमध्ये हिवतापाचे ७५२ रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र हिवतापाच्या रुग्णांचा आलेख उतरता होता; परंतु करोनाकाळात पुन्हा एकदा हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

याउलट दरवर्षी पावसाळ्यात आढळल्या जाणाऱ्या लेप्टोच्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. या वर्षी लेप्टोचे १४ रुग्ण नोंदले गेले. गेल्या वर्षी याच महिन्यात ७४ रुग्ण आढळले होते. त्याचप्रमाणे गॅस्ट्रो, हेपेटायटिस, डेंग्यूच्या रुग्णांमध्येही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.

हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढली तरी गंभीर प्रकृतीचे रुग्ण फारसे आढळलेले नाहीत. तसेच ताप आलेल्या रुग्णांच्या निदानावरही भर देण्यात आला आहे. जुलैमध्ये पावसाचा जोर कमी असल्याने तसेच टाळेबंदीत बहुतांश रहिवासी घरात असल्याने लेप्टोसह इतर आजारांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. ताप आला तरी अनेक रुग्ण करोनाच्या भीतीने दवाखान्यात आलेले नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले.

ताप आलेल्या रुग्णांच्या तातडीने हिवतापाच्या चाचण्या करण्याच्या सूचना सर्व पालिका रुग्णालये आणि दवाखान्यांना दिल्या आहेत. तसेच हिवतापाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांना तातडीने उपचार देण्याचेही मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केले आहे. डासांच्या अळ्यांची उत्पत्तिस्थाने नष्ट करणे आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशक नियंत्रण विभागाने मे महिन्यापासून सुमारे ६६ हजार परिसरांचे सर्वेक्षण केले. तसेच सुमारे दोन लाख उत्पत्तिस्थानांची तपासणी केली असून यातील सुमारे पाच हजार उत्पत्तिस्थाने नष्ट केली आहेत.

हिवताप विभागातील कर्मचारी करोना कामकाजामध्ये गुंतले असल्याने रुग्णनिदान, सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आता या विभागातील कर्मचाऱ्यांना रुग्णनिदान, सर्वेक्षणावर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

– डॉ. मंगला गोमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महापालिका

स्वाइन फ्लू गायब

या वर्षी जुलैमध्ये स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या वर्षी याच महिन्यात १२३ स्वाइन फ्लूचे रुग्ण आणि एका मृत्यूची नोंद होती.

पावसाळय़ातील आजारांची रुग्णसंख्या

जुलै २०१९      मृत्यू             जुलै २०२०      मृत्यू

हिवताप                        ४३८           ०                  ८७२                 ०

लेप्टो                              ७४            ५                    १४                 ०

स्वाइन फ्लू                   १२३            १                    ०                   ०

गॅस्ट्रो                            ९९४             ०                   ५३                 ०

कावीळ                          २७०             ०                    १                 ०

डेंग्यू                                २९              १                  ११                 ०

Story img Loader