उन्हाच्या काहिलीने मुंबईकर त्रस्त असतानाच आता हिवतापानेही (मलेरिया) डोके वर काढले आहे. एरव्ही पावसाळ्यात हिवतापाचा प्रादुर्भाव होत असतो. यंदा मात्र उन्हाळ्यातच पालिका रुग्णालयांमध्ये तब्बल ४२८ हिवतापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्येही हिवतापाच्या रुग्णांची संख्या जास्त असून त्याची आकडेवारी मुंबई महापालिकेकडे उपलब्ध नाही. एकीकडे हिवतापाच्या थैमानाचे हे चित्र असतानाच पालिकेतील आरोग्य विभागातील मोठा कर्मचारीवर्ग निवडणुकीच्या कामात गुंतला आहे.
पावसाळ्यातील वातावरण हिवतापाच्या प्रादुर्भावासाठी पोषक ठरते. मात्र, सध्या कडक कडक उन्हाळा असतानाही मुंबईत पालिकेच्या रुग्णालयात हिवतापाचे रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने २५ एप्रिलपर्यंत मुंबईतील तब्बल ७१,०१९ जणांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची तपासणी केली. त्यापैकी ४२० जणांना हिवताप झाल्याचे निष्पन्न झाले असून हे रुग्ण पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची आकडेवारी पालिकेकडे नाही. त्यामुळे मुंबईत नेमक्या किती जणांना हिवताप झाला आहे याची माहिती पालिकेकडे नाही.
धू्म्रफवारणीत खंड
गेले काही दिवस धूम्रफवारणी आणि कीटकनाशक फवारणीमध्ये खंड पडला असून काही विभागांमध्ये धूम्रफवारणी अभावानेच होत आहे. मोठय़ा संख्येने निवडणुकीच्या कामासाठी गेलेले आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि डिझेल-पेट्रोलच्या तुटवडय़ाने हिवताप प्रतिबंध उपाययोजनांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. धूम्रफवारणी होत नसल्याने अनेक भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी हळूहळू पुन्हा हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हिवतापाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात हिवताप थैमान घालण्याची शक्यता आहे.
फवारणीचे गणित
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत २२७ यंत्रांद्वारे धूम्रफवारणी केली जाते. दिवसभर धूम्रफवारणी करण्यासाठी एका यंत्रात ३२ लिटर डिझेल आणि तीन लिटर पेट्रोल लागते. परंतु लेखापाल विभागाने धूम्रफवारणीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या साठय़ात कपात केली आहे. ‘आवश्यकतेनुसारच डिझेल वापरा’, असा सल्ला आरोग्य विभागाला देण्यात आला आहे. परिणामी सध्या एका धूम्रफवारणी यंत्रासाठी निम्मे म्हणजे १६ लिटर डिझेल आणि दीड लिटर पेट्रोल दिले जाते. यंत्रातील इंधनाचा साठा संपल्यानंतर कर्मचारी काम बंद करतात. परिणामी उर्वरित परिसरात धूम्रफवारणी होतच नाही. परिणामी अनेक विभागांतील धूम्रफवारणी अर्धवटच होत आहे.

Story img Loader