|| प्रसाद रावकर
‘त्या’ पत्राकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात दोन वेळा मलबार हिल टेकडीवर भूस्खलन
मुंबई : मलबार हिल टेकडीची मोठ्या प्रमाणावर धूप होत असून पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याचा इशारा एका माजी आमदाराने पालिकेच्या जल विभागाला एक वर्षापूर्वी पत्र पाठवून दिला होता. तसेच तातडीने टेकडीच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात यावी, असेही पत्रात सूचित करण्यात आले होते. मात्र याकडे कानाडोळा करण्यात आला. परिणामी, यंदा पावसाळ्यात दोन वेळा टेकडीवरून भूस्खलन झाले.
कोणे एकेकाळी मलबार हिल टेकडी वृक्षवल्लीने नटली होती. मुंबईची पाण्याची गरज ओळखून ब्रिटिशांनी १८८१च्या सुमारास टेकडीवर जलाशय बांधला आणि अधिकाऱ्यांना फेरफटका मारता यावा, यासाठी त्यावर छोटेखानी उद्यानही उभारले. आजघडीला या जलाशयामधून कुलाबा, कफपरेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, फोर्ट, चिराबाजार, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, नळबाजार, ताडदेव आणि आसपासच्या परिसराला दररोज २२० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तानसा आणि वैतरणामधून मुख्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून या जलाशयात पाणी आणले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हळूहळू टेकडीचे रूप बदलू लागले. वृक्षवल्लींच्या जागी सिमेंटचे जंगल उभे राहिले. कालौघात टेकडी धोकादायक बनू लागल्याचे ५ ऑगस्टला झालेल्या भूस्खलनावरून उजेडात आले.
जलाशय बांधला तेव्हा त्याच्या आजूबाजूला फारशा वास्तू नव्हत्या. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये टेकडीवर बहुमजली इमारती उभ्या राहिल्या. पावसाळ्यात टेकडीवरून मोठ्या प्रमाणावर दगड, माती वाहून जात असल्याने तिची धूप होत आहे. जलाशयही जुना झाल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जलाशयात साचलेला गाळ रोबोटच्या साह्याने उपसण्यात येतो. मात्र जलाशय पूर्णपणे गाळमुक्त होत नाही. त्यामुळे जवळच एक २० दशलक्ष लिटर क्षमतेची तात्पुरती टाकी बांधून जलाशयाची दुरुस्ती करावी, अशी सूचना करणारे पत्र शिवसेनेचे माजी आमदार अरविंद नेरकर यांनी ३ जून २०१९ रोजी पालिकेच्या जल अभियंत्यांना पाठविले होते.
पालिकेने पत्राची दखल घेऊन टेकडीवर आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत बांधली असती तर ५ ऑगस्टची दुर्घटना टळली असती. टेकडीच्या दक्षिणेचा काही भाग कोसळून बी. जी. खेर मार्ग आणि एन. एस. पाटकर मार्गाचे नुकसान झाल्यानंतर पालिकेला जाग आली आहे. काही दिवसांपूर्वी एन. एस. पाटकर मार्गावरील पारशी सोसायटीत या टेकडीवरून भूस्खलन झाले. यावरून भविष्यात आणखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता तरी पालिकेने ही टेकडी सुरक्षित करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी अरविंद नेरकर यांनी केली आहे.
ब्रिटिशकालीन जलाशयाची दोन वेळाच तपासणी
मुंबईमधील इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्याचे बंधन पालिकेने घातले आहे. मात्र ब्रिटिशकालीन जलाशयाची आतापर्यंत १९८६ आणि २०१७ अशी दोन वेळा संरचनात्मक तपासणी करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. जलाशयाच्या खालील टेकडीच्या भागाचीही धूप झाली आहे. त्यामुळे भविष्यात जलाशयालाही धोका होऊ शकतो. जलाशय फुटला तर दक्षिण मुंबईत हाहाकार उडेल, अशी भीती माजी आमदार अरविंद नेरकर यांनी ३ जून २०१९ रोजी पालिकेच्या जल अभियंत्यांना पत्रात व्यक्त केली होती.