लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटला अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. असे असताना आणि विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावून उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही खटल्यातील प्रमुख आरोपी व भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या बुधवारी न्यायालयात अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे, विशेष न्यायालयाने त्यांच्या नावे नव्याने जामीनपात्र वॉरंट काढून त्यांना २ डिसेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

दुसरीकडे, साध्वी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्या खटल्याच्या सुनावणीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. साध्वी यांच्यावरील उपचाराची कागदपत्रेही यावेळी न्यायालयात सादर करण्यात आली. त्यानंतर, विशेष न्यायालयाने साध्वी यांच्या नावे नव्याने जामीनपात्र अटक वॉरंट काढले.

आणखी वाचा-विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू

साक्षीपुरावे नोंदवण्यात आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयात या प्रकरणी अंतिम युक्तिवाद सुरू आहे. विशेष न्यायालयाने ५ ऑक्टोबर रोजी साध्वी यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना १३ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, साध्वी बुधवारी अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे, न्यायालयाने साध्वी यांच्या नावे नव्याने जामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना २ डिसेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malegaon blast case sadhvi pragya singh absence despite bailable warrant mumbai print news news mrj