मुंबई : मालेगाव येथे सुमारे १६ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधिक प्रकरणातील खटला अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला. खटल्यातील साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. त्यामुळे, बुधवारपासून आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांवरील अंतिम युक्तिवादाला सुरूवात होणार आहे.
बचाव पक्षाच्या अंतिम साक्षीदाराची मंगळवारी साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर, पुरावे, कागदपत्रांबाबतची पडताळणी विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के लाहोटी यांनी पूर्ण केली. फिर्यादी आणि बचाव पक्षातर्फे आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांवरील अंतिम युक्तिवादाला बुधवारपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक; आशिष शेलार गटाच्या संजय नाईकांचा पराभव
मालेगाव येथील मशिदीजवळ २८ सप्टेंबर २००६ रोजी मोटारसायकलचा स्फोट होऊन सहाजण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. दहशतवादाच्या आरोपांतर्गत भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर खटला चालविण्यात येत आहे. त्यातील, समीर कुलकर्णीविरोधातील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
संपूर्ण खटल्यादरम्यान, फिर्यादी पक्षाने ३२३ साक्षीदार तपासले असून त्यापैकी ३४ साक्षीदार फितूर झाले आहेत. आरोपींकडून आठ साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी सात जणांना पुरोहित याच्यातर्फे पाचारण करण्यात आले होते.