मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित विशेष न्यायालयात सुरू असलेला खटला सध्या अंतिम टप्प्यात आहे. या खटल्याच्या सुनावणीत एका आरोपीच्या वकिलाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप केला.
आरोपी सुधाकर द्विवेदी यांच्यावतीने वकील रणजित सांगळे यांनी बाजू अंतिम युक्तिवाद करताना उपरोक्त दावा केला. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) माजी अधिकारी मेहबूब मुजावर यांनी आधीच प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखत देताना फरारी आरोपी संदीप डांगे आणि रामचंद्र कलसंग्रा यांचा एटीएसच्या कोठडीत मृत्यू झाल्याचे सांगितले होते. परंतु, विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात एटीएसने त्या दोघांना फरारी दाखवले होते, असेही सांगळे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले.

मुजावर यांना परमबीर सिंग यांनी बोलावले होते व नागपूरला जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करून मुंबईत आणण्याचे आदेश दिले होते. परंतु, तोंडी आदेश दिल्याने मुजावर यांनी त्याचे पालन केले नाही. परिणामी मुजावर यांना सोलापुरातील एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. मुजावर यांनी सोलापूर न्यायालयात दिलेल्या जबाबात ही माहिती उघडकीस आली असून, मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा व हिंदू दहशतवादाचे खोटे कथानक पसरवण्यासाठीच होता, असा दावाही सांगळे यांनी युक्तिवादाच्या वेळी केला.

मालेगाव येथे सुमारे १६ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधिक प्रकरणातील खटला अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. खटल्यातील साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्याची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाली. सध्या नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांवरील अंतिम युक्तिवादाला मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे.

Story img Loader