मुंबई : मालेगाव येथील व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून कोट्यावधींचा गैरव्यवहार केला असून सॉफ्टवेअर आयातीच्या नावाखाली सात कोटी १४ लाख रुपये परदेशात पाठवले आहेत. दोन बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम अमेरिका, सिंगापूर व युनायटेड अरब अमिराती या देशांमध्ये पाठवण्यात आली. ही रक्कम ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीमधून कमावण्यात आल्याचा संशय आहे.
ब्लेझ इंटरनॅशनलच्या बँक खात्यावरून तीन कोटी ३२ लाख ९९ हजार रुपये परदेशात पाठवण्यात आले आहेत. त्यात यूएईमधील प्रिमीयम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला दोन कोटी ३३ लाख व अमेरिकेतील हमदान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला ४७ लाख ८७ हजार रुपये व सिंगापूर येथील अनाबिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेडला ५१ लाख ७५ हजार रुपये पाठविण्यात आले. त्याशिवाय ब्लेझ इंटरनॅशनलने आणखी एका बँक खात्यातून यूएईतील प्रिमियम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला ३८ लाख ५२ हजार रुपये पाठविले. दुसरी बनावट कंपनी फर्बियन इंटरनॅशनलच्या बँक खात्यातून तीन कोटी ४३ लाख रुपये पाठवण्यात आले आहेत. त्यातील यूएईतील केअर जनरल ट्रेडिंगला दोन कोटी आठ लाख, हमदान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला ८२ लाख ५९ हजार रुपये आणि अनाबिया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेडला ५२ लाख रुपये पाठविले. आयटी सोल्यूशन, वेब डेव्हलपमेंट, प्रशिक्षण व इतर डिजिटल सेवांसाठी ही रक्कम पाठवण्यात आल्याचे कागदोपत्री नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्या आरोपी सिराज मेमन याने बेकायदेशीरिरित्या रक्कम परदेशात पाठवण्यासाठी उघडल्या होत्या. त्याशिवाय यूएईमधील स्मार्ट केअर जनरल ट्रेडिंग ही कंपनी देखील मेमन यांच्या नावाने नोंदवली आहे.
हेही वाचा : टोरेस गैरव्यवहार प्रकरण : नऊ परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस
बहुसंख्य कंपन्या एकाच्या मालकीच्या
या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा खरा लाभार्थी मोहम्मद भागड, जो ‘चॅलेंजर किंग’ असून तो या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी आहे. तसेच ईडीच्या तपासात मेमनने १३ कोटी २६ लाख रुपये रोख स्वरूपात एका हवाला व्यापाऱ्याकडे हस्तांतरित केले आहेत. ती रक्कमही दुबईतील स्मार्ट केअर जनरल ट्रेडिंग, सेव्हन सीज इंटरनॅशनल, कोबाल्ट ट्रेडिंग, सूर्या आयटी सोल्यूशन, आणि प्रिमियम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेड यांसारख्या विविध संस्थांकडे पाठविण्यात आली आहे. बनावट कंपनीद्वारे २१ बँक खात्यांतून करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्या एकाच्या मालकीच्या असून त्या नवी मुंबई, सूरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले.