अंधेरीत चार बंगला परिसरात पूर्णपणे वृक्षलागवडीसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीने मॉल-व्यापारी संकुलाचे बांधकाम होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत महानगरपालिकेचे लक्ष वेधल्यावरही प्रशासनाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असून या प्रकल्पात भागीदार असलेल्या कंपनीत खासदार जया बच्चन यांची गुंतवणूक आहे, हे विशेष.
अंधेरी पश्चिमेला जयप्रकाश रस्त्यावर चार बंगल्याजवळ ३० एकरचा भूखंड मलनिस्सारण प्रकल्प, निराधारांसाठी घरकुल योजना, सरकारी कर्मचारी निवासस्थानासाठी राखीव होता. मात्र, वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे प्रकल्प बांधण्याचे ठरल्यावर मेट्रो रेल्वेसाठी कारडेपोला जागा देण्यासाठी या भूखंडावरील सर्व आरक्षणे हटवण्यात आली. राज्याच्या नगरविकास विभागाने त्याबाबतची अधिसूचना काढली. तसेच कारडेपोलगतचा ३० मीटर रुंदीचा पट्टा (बफर झोन) पूर्णपणे केवळ वृक्षलागवडीसाठी राखीव ठेवण्यात आला. १२ जुलै २००५ रोजी नगरविकास विभागाने याबाबतची अधिसूचना काढली. तसेच त्यानुसार महानगरपालिकेने आपल्या आराखडय़ातही नोंद करावी, असेही नमूद केले.
मात्र, हरितपट्टय़ासाठी ठेवलेले हे आरक्षण धाब्यावर बसवत महापालिकेने या जागेवर मॉल-व्यापारी संकुलाच्या बांधकामास परवानगी दिली. ‘एचडीआयएल’ आणि ‘एक्स्टसी रिअ‍ॅलिटी प्रा. लि.’ या कंपनीतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांची ‘एक्स्टसी रिअ‍ॅलिटी प्रा. लि.’मध्ये सुमारे पाच कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
जागेचे आरक्षण आणि प्रकल्पाबाबत इतर माहिती व कागदपत्रे हाती आल्यावर आम्ही महापालिकेचे लक्ष वेधले. हा मॉल हरितपट्टय़ासाठी राखीव जागेवर बांधण्यात येत असल्याची तक्रार केली. पण महापालिकेने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप माजी आयपीएस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते वाय. पी. सिंग यांनी केला.
वृक्षलागवडीसाठी आरक्षित जागेवरील मॉलचे बांधकाम पूर्णपणे अवैध ठरत असल्याने पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी हे बांधकाम तातडीने पाडावे आणि तिथे वृक्षलागवड करावी, अशी मागणी सिंग यांनी केली. ही परवानगी देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘एचडीआयएल’चे सारंग वाधवान ऊर्फ सन्नी देवान यांनी आपल्या ‘पेज थ्री सेलिब्रेटी’च्या प्रतिमेला जागत वृक्षरोपणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही सिंग यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जया यांना आवाहन
जया बच्चन यांची ‘एक्स्टसी रिअ‍ॅलिटी प्रा. लि.’मध्ये गुंतवणूक आहे. पण आपल्या गुंतवणुकीतून उभा राहत असलेला हा मॉल वृक्षलागवडीसाठीच्या राखीव जागेवर बांधण्यात येत आहे याची त्यांना कल्पना असण्याची शक्यता नाही. पण आता प्रकरण उघडकीस आले आहे. त्यामुळे खासदार असलेल्या जया बच्चन यांनी मॉलचे बांधकाम पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि हरितपट्टा विकसित करण्यासाठी या जागेवर पहिले वृक्षारोपण करून समाजापुढे आदर्श घालून द्यावा, असे आवाहन वाय. पी. सिंग यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mall on green plate reserve land