मुंबई : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप एका  महिलेने केले असून त्यांची कन्या मल्लिका दुआ हिने या प्रकरणात मी टू चळवळीला पाठिंबा देताना वडील त्यांची लढाई स्वत: लढतील अशी भूमिका घेतली, या प्रकरणात निष्कारण तिलाही ओढल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘जर तुम्ही वर्णन केले तसे माझे वडील वागले असतील तर ते मलाही मान्य नाही ते धक्कादायक व वेदनादायी आहे’,  असे मल्लिका दुआ हिने म्हटले आहे.

‘बाबा ही माझी नाही तर तुमची लढाई आहे. ही लढाई तुम्हालाच लढावी लागेल. आणि या लढय़ात मी तुमच्यासोबत आहे’असे सांगून मल्लिकाने वडिलांना धीर दिला आहे.

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर रविवारी पत्रकार निशिता जैन हिने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले,  त्यावर मल्लिकाने स्पष्टीकरण केले आहे. विनोद दुआ यांनी तीन दशके आपली छळवणूक केली असा आरोप जैन हिने केला होता. मल्लिका हिच्या कॉमेडी रिअ‍ॅलिटी शोमध्ये अक्षय कुमारने काही टिप्पणी केली होती. त्यावर निशिता जैन हिने फेसबुक पोस्टमध्ये तुझे वडीलही काही वेगळे नाहीत, त्यांनी माझ्यावर १९८९ मध्ये लैंगिक अत्याचार केला होता, असा टोला मल्लिका दुआला लगावला. मल्लिका दुआ ही तिच्या स्त्रीवादी विचारांसाठी प्रसिद्ध असून तिने सांगितले की, निशिताने या वादात मला ओढण्याचे कारण नव्हते, हे वाईटच आहे. मी टू चळवळीला माझा पाठिंबा आहे, पण असे असले तरी  केवळ करमणुकीसाठी महिलांना विधाने करण्यास भाग पाडण्यात येऊ नये. ही चळवळ मूळ उद्दिष्टांपासून भरकटता कामा नये. आताची लढाई ही माझ्या वडिलांची आहे ते ती लढतील, मी त्यांच्या पाठीशी आहे. उजव्या विचारसरणीच्या जल्पकांनी (ट्रोल्स) वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याला मी घाबरत नाही.   निशिता जैन हिच्या पोस्टनंतर समाजमाध्यमांवर मल्लिका आणि विनोद दुआंवर सडकून टीका झाली असून  विनोद दुआ गेली दोन वर्षं भाजप सरकारवर प्रचंड टीका करत आहेत. यामुळे अनेक भाजप समर्थकांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली. विनोद  दुआ हे सध्या दी वायर मध्ये काम करीत असून  नियोक्तयांनी त्यांच्याकडे  निशिता जैन हिच्या पोस्टवर स्पष्टीकरण मागितले आहे. दुआ हे दी वायरचे सल्लागार संपादक असून त्यांनी १९८९ मध्ये निशिताची लैंगिक छळवणूक केली होती. ही २६ वर्षांपूर्वीची घटना असली तरी दी वायरने त्याची दखल घेतली असून आमच्या आयसीसी समितीने त्यांना जाब विचारला आहे. उत्तराची आम्ही वाट पाहात आहोत असे द वायरच्या निवेदनात म्हटले आहे.