मेळघाटासह राज्यातील १५ कुपोषित आदिवासी जिल्ह्यांमध्ये तीव्र व अतितीव्र स्वरूपाची किती कुषोषित बालके आहेत आणि आरोग्य केंद्रांच्या पातळीवर आतापर्यंत किती बालविकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, याची तपशीलवार माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. तसेच मेळघाट परिसरातील रिक्त ८०० शासकीय कर्मचाऱ्यांच्या जागाही तात्काळ भरा, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मेळघाटातील कुपोषणाबाबत पौर्णिमा उपाध्याय यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. मेळाघाटामध्ये ८०० कर्मचाऱ्यांच्या जागा अद्याप रिकाम्या असल्याची माहिती या वेळी सरकारकडून देण्यात आली. त्यावर या जागा अद्याप का भरण्यात आल्या नाही, असा सवाल करीत त्या तात्काळ भरल्या जाव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले.
मेळघाटासह १५ कुपोषित आदिवासी जिल्ह्यांत कुपोषणाची परिस्थिती अद्याप ‘जैसे थे’ असून आवश्यक ती बालविकास केंद्रेही उभारण्यात आलेली नाहीत, असा अंदाज आह़े त्यामुळे न्यायालयाने या बाबतची माहिती मागविली आह़े तसेच करार पद्धतीवर असलेले किती डॉक्टर या भागातील शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये रुजू झाले, याचीही माहिती देण्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
कुपोषणाच्या समस्येबाबत शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती गोंधळाची असल्याचे उपाध्याय यांनी लक्षात आणून दिल्यानंतर ही माहिती तपासून नव्याने व्यवस्थित मांडावी, असेही निर्देश न्यायालयाने दिल़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा