१५० कोटींच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी १५ ठिकाणी छापे टाकून १५० कोटी रुपयांच्या ५० मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली. त्यातील ४ ते ५ मालमत्ता आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सूरज चव्हाण यांच्या, तर सुमारे १०० कोटींच्या मालमत्तांची कागदपत्रे सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांची असल्याचे सूत्रांनी सांगितले.
करोना काळात मुंबई महानगरपालिकेने दिलेली कंत्राटे चार ते पाच मध्यस्थांच्या माध्यमातून देण्यात आली. त्यात युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्यासह फर्निचरवाला बंधु आदींचा समावेश आहे. चव्हाण यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ‘ईडी’ला उपनगरात खरेदी करण्यात आलेल्या चार ते पाच सदनिकांची माहिती मिळाली आहे. त्यांची किंमत १० ते १२ कोटी रुपये असल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कंत्राटांबाबत तसेच मालमत्ता व इतर व्यवहारांबाबत चौकशीसाठी चव्हाण यांना सोमवारी ‘ईडी’ कार्यालयात बोलवण्यात आले आहे.
‘ईडी’ने बुधवारी १५ ठिकाणी छापे टाकून १५० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ५० स्थावर मालमत्तांची कागदपत्रे, १५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि गुंतवणूक, सुमारे ६९ लाख रुपये रोख व दोन कोटी ४६ लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी सनदी अधिकारी जयस्वाल यांच्या वांद्रे (पूर्व) येथील निवासस्थानावर छापा टाकून ‘ईडी’ने १३ लाखांची रोकड जप्त केली. त्याबरोबरच मालमत्तांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. ‘ईडी’ने जयस्वाल यांची मढ आयलंडमधील अर्धा एकर जमीन आणि त्यांच्या इतर अनेक मालमत्तांचीही ओळख पटवली आहे. या सर्व मालमत्तांची किंमत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
जयस्वाल यांच्या मढ आयलंडच्या मालमत्तेव्यतिरिक्त ‘ईडी’ने मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील इतर दोन ठिकाणीही छापे टाकले. त्या मालमत्ता महानगरपालिकेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि एका संशयित पुरवठादाराच्या होत्या. दरम्यान, या मालमत्ता वडिलोपार्जित असल्याचे जयस्वाल यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच आपल्याला याप्रकरणी चुकीच्या पद्धतीने अडवकण्यात येत असल्याचेही जयस्वाल यांचे म्हणणे आहे. ‘ईडी’ने छापा कारवाईत महापालिका अधिकारी, मध्यस्थ, पुरवठादार आणि कंत्राटदार यांचे १२ मोबाइल संच जप्त केले आहेत. ईडीने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सव्र्हिसेसच्या चार भागीदारांचे व्हॉट्सअॅप संभाषणही मिळवले आहे.
सूरज चव्हाणसह चौघांची सोमवारी चौकशी
या संपूर्ण प्रकरणात सूरज चव्हाण कंत्राट मिळवून देण्यासाठी मध्यस्थी म्हणून काम करत असल्याचे ‘ईडी’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ‘ईडी’ने सूरजसह इतर चौघांना समन्स बजावले असून, त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी ‘ईडी’कडे चौकशीस उपस्थित राहण्यासाठी काही वेळ मागितला होता. त्यानुसार तेही सोमवारी ‘ईडी’समोर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.