मुंबई : कथित करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील (बॉडी बॅग) घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. पेडणेकर या तपासात सहकार्य करत आहेत. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास आपला आक्षेप नाही, असे मुंबई पोलिसांतर्फे सांगण्यात आल्यानंतर न्यायालयाने पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणी पेडणेकर यांना अटक करण्याची आणि चौकशी करण्याची आवश्यकता दिसत नसल्याचे नमूद करून न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. तसेच, तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. पेडणेकर यांना दिलेले हे अंतरिम संरक्षण न्यायालयाने वेळोवेळी कायम ठेवले.
हेही वाचा – ‘चावीवाले’ निवडणूक कामात, पाणी कोण सोडणार?
हेही वाचा – रामनाथ गोएंका यांना आदरांजली
या प्रकरणी गुरूवारी सुनावणी झाली. त्यावेळी, पेडणेकर तपासात सहकार्य करत असल्याचे आणि त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास आपली काहीही हरकत नाही, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायमूर्ती जमादार यांच्या एकलपीठाने पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, त्यांनी त्यासाठी केलेली याचिका निकाली काढली.