मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. १०३९ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. राऊत सध्या याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत.

हेही वाचा <<< अडकू नये म्हणूनच संजय राऊत पडद्यामागून गुन्ह्यात सक्रिय; ईडीचा विशेष न्यायालयात दावा – राऊतांच्या जामिनाला विरोध

हेही वाचा <<< सिद्धार्थनगरमधील सदनिकांच्या हस्तांतरण-नियमितीकरणासाठी विशेष मोहीम

संजय राऊत यांच्यासह पाच जणांविरोधात हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संजय राऊत यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले हे पहिले आरोपत्र असून ईडीने विशेष न्यायालयात हे आरोपत्र दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘ईडी’ने आतापर्यंत गैरव्यवहाराच्या रकमेचा माग काढला असता ‘एचडीआयएल’कडून प्रवीण राऊतच्या खात्यात सुमारे ११२ कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यातील एक कोटी आठ लाख रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांना देण्यात आले. त्यातील ५५ लाख रुपये २००९-२०१० मध्ये कर्जाच्या (असुरक्षित) स्वरूपात वर्षां राऊत यांना मिळाले. त्यातून एक सदनिका खरेदी करण्यात आली. याशिवाय प्रवीण राऊतचे व्यावसायिक संबंध असलेल्या प्रथमेश डेव्हलपर्स यांच्यामार्फत वर्षां राऊत आणि संजय राऊत यांना ३७ लाख ५० हजार रुपयांचा फायदा मिळाला. त्यासाठी वर्षा आणि संजय राऊत यांनी अनुक्रमे १२ लाख ४० हजार व १७ लाख १० रुपये गुंतवणूक केली होती. अवनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीतील केवळ पाच हजार ६२५ रुपयांच्या गुंतवणुकीवर वर्षां राऊत यांना १३ लाख ९४ हजार फायदा मिळाला, अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात दिली होती. याशिवाय संजय राऊत हे या प्रकरणाच्या कटातही सहभागी असून प्रवीण राऊत याचा मोहरा म्हणून वापर करण्यात आला. प्रवीण राऊत याने संजय राऊत यांच्याशी असलेली जवळीक दाखवून म्हाडाकडून परवानगी मिळवल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे. राऊत यांच्याकडे आलेल्या रकमेतून आठ करारांद्वारे १० भूखंड अलिबाग येथील किहीम येथे खरेदी करण्यात आले. हे करार स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची पत्नी वर्षां राऊत यांच्या नावावर आहेत. तसेच पत्राचाळ गैरव्यवहारातील रक्कम व्यवहारात आणण्यासाठी अवनी इन्फ्रास्ट्रक्चर स्थापन करण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय संजय राऊत कुटुंबियांच्या देश-विदेशातील दौऱ्यांचा (प्रवासावर) खर्च प्रवीण राऊतने केल्याचा आरोप आहे.