माळशिरसचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हनुमंत डोळस यांचं आज मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते कर्करोगाने ग्रस्त होते, मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या मुळगावी दसूर (माळशिरस) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे आज निधन झाले. श्री. हनुमंतराव डोळस हे विकासकामांविषयी व विधिमंडळ कामकाजाविषयी अत्यंत आस्था असलेले आमदार होते. त्यांच्या निधनाने पक्षाची व माळशिरस तालुक्याची मोठी हानी झाली आहे. डोळस कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. pic.twitter.com/1GKJuAeeRn
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 30, 2019
गेले काही महिने ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला काही दिवस त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला मात्र, गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. दरम्यान, आज दुपारी १२.१५ वाजता त्यांची सैफी रुग्णालयात प्राणज्योत मालवली.
डोळस यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीमध्ये भरुन न निघणारी पोकळी पक्षात निर्माण झाली आहे. एक अभ्यासू, परखड वक्ता आणि मतदारसंघावर मजबूत पकड असलेला उमदा आमदार आम्ही गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात पक्ष सहभागी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
२००९ आणि २०१४ या दोन वेळा आमदार हनुमंत डोळस हे माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार राहिले आहेत. आमदार म्हणून त्याचं काम वाखाणण्याजोग होतं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उभारणीमध्येही त्यांचे महत्वाचे योगदान राहिले होते.