मुंबई : मालवण येथील शिवपुतळा दुर्घटनाप्रकरणी अटकेत असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याने आपटे याला कोठडीत ठेवण्याची गरज नाही. शिवाय, या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. त्यामुळे, हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम या प्रकरणी लागू होऊ शकत नाही, असे सकृतदर्शनी निरीक्षण नोंदवून न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या एकलीपीठाने आपटे याला जामीन मंजूर केला.
तत्पूर्वी, निविदेतील अटीनुसार पुतळ्याच्या बांधकामाकरिता लागणाऱ्या साहित्यासाठी आपटे याने ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे, पुतळा दुर्घटनाग्रस्त व्हावा, अशी तजवीज याचिकाकर्ता का करेल, असा प्रश्न आपटे याच्या वतीने युक्तिवाद करताना वकील गणेश सोवनी यांनी केला. त्याचप्रमाणे, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे तक्ररीत नमूद नाही. त्यामुळे, या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम लागू केले जाऊ शकत नाही, असा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे, दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीचा गोपनीय अहवाल सरकारी वकिलांनी सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर केला. तसेच, त्या अहवालाचा दाखला देऊन आपटे याची याचिका फेटाळण्याची मागणी केली.
हेही वाचा – ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार
हेही वाचा – बेकायदा झोपड्या आता प्राधिकरण रोखणार! खासगी यंत्रणांची मदत घेणार
दरम्यान, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपटे, पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांनी जामिनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.