मुंबई : मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात नुकतेच आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. तसेच, दोघांना कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी दाद मागण्याचेही स्पष्ट केले. परंतु, न्यायालयाने दोघांच्या जामिनासाठीच्या याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले व आरोपपत्राची प्रत न्यायालयात सादर करण्याचे आदेश सरकारला दिले.
सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपटे आणि पाटील यांनी जामिनिसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठासमोर मंगळवारी या दोघांची याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी, त्यांच्यावतीने वकील निरंजन मुंदरगी आणि गणेश सोवनी यांनी प्रकरण काय हे थोडक्यात न्यायालयाला सांगितले. त्यावर, दोन्ही आरोपींविरोधात दोन-तीन दिवसांपूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील गीता मुळ्ये यांनी न्यायालयाला दिली. तसेच, याच कारणास्तव दोन्ही आरोपींनी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट केले. त्याला आपटे आणि पाटील यांच्या वतीने विरोध करण्यात आला. तेव्हा, दोन्ही आरोपींना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्यास आपण सांगत नाही. त्यांच्या याचिकांवर येथेच सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, प्रकरणाची सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी ठेवताना त्यावेळी आरोपपत्राची प्रत सादर करण्याचे आदेश सरकारी वकिलांना दिले.
हेही वाचा >>>शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे
दरम्यान, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा कांस्य पुतळा कोसळल्याचा दावा आपटे याने जामिनाची मागणी करताना केला आहे. यापूर्वी, आपण नौदलासाठी कांस्य पुतळ्यांचे काम केले आहे. परंतु, नौदलाकडून आपल्या कामाबाबत कधीच तक्रार केली गेली नाही. याउलट, धातू शास्त्रांतील तांत्रिक कौशल्याबाबत काहीच माहीत नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी दुर्घटनेच्या नऊ तासांच्या आतच या प्रकरणी तक्रार नोंदवल्याचा दावा आपटे याने याचिकेत केला आहे. शिवाय, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे तक्ररीत नमूद नाही. त्यामुळे, हे प्रकरण निष्काळजीपणाचे असू शकते, असा दावाही आपटे याने याचिकेत केला आहे. हा पुतळा अनेक शतके टिकेल आणि सुस्थितीत राहील हे लक्षात घेऊन खबरदारीचे सर्व उपाय केल्याचा दावा देखील आपटे यांनी जामिनाची मागणी करताना केला आहे.