मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील शासकीय भूखंडावरील मोकळ्या जागेत भले मोठे स्टुडिओ उभारण्याचा घोटाळा पुढे आलेला असतानाच, आता विलेपार्ले येथील गोल्डन टोबॅको कंपनीच्या आवारातील मोकळ्या भूखंडावर तसेच स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. तात्पुरत्या परवानगीद्वारे कायमस्वरूपी स्टुडिओ उभारण्यात आले असून, दिवसरात्र सुरू असलेल्या चित्रीकरणामुळे ध्वनिप्रदूषणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी दंड थोपटले आहेत.
हेही वाचा >>>मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन; आरोपीस पाच तासांत अटक
आठ एकरवर पसरलेल्या गोल्डन टोबॅको कंपनीच्या प्रवेशद्वारावर गुजरातमधील न्यायालयाचा प्रवेश बंदीचा आदेश आहे. मात्र तो झुगारून ये-जा सुरू आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान यांसारख्या अभिनेत्यांचे चित्रीकरण दिवसरात्र सुरू आहे. त्यामुळे शेजारील आठ-दहा सोसायट्यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. हे तात्पुरते स्टुडिओ उभारले गेले नसते तर ध्वनिप्रदूषण झाले नसते, असे विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. जयंत गांधी यांनी सांगितले. मोकळ्या भूखंडावर कुठलेही बांधकाम करण्यासाठी पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र या ठिकाणी पालिकेच्या के पश्चिम विभागाने शेड उभारण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली. या तात्पुरत्या परवानगीच्या जोरावर या ठिकाणी पक्के बांधकाम असलेले स्टुडिओ उभारण्यात आले आहेत. तात्पुरत्या परवानगीमध्ये पक्के बांधकाम करता येत नाही.
हेही वाचा >>>मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन; आरोपीस पाच तासांत अटक
इमारत प्रस्ताव विभागाने अधिकृत परवानगी दिली असती तर पक्के बांधकाम होऊन आवश्यक ती काळजी घेतली गेली असती. त्यामुळे आवाज प्रदूषणही झाले नसते, याकडे डॅा. गांधी यांनी लक्ष वेधले. हे सर्व स्टुडिओ एकमेकांना खेटून असून आगीसारखी घटना घडली तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे, याबाबत वॉच डॉग फौंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा, निकोलस अल्मेडा, ॲड. व्हिव्हिअन डिसोझा, रीता डिसोझा, ट्युलिप मिरांडा यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यानंतरही या स्टुडिओंविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. या स्टुडिओंविरुद्ध उपायुक्त विजय बालमवार यांनी कारवाई केली. परंतु त्यांना बदलीला सामोरे जावे लागले. तात्पुरती परवानगी सहा महिन्यांसाठी असते. अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले असले तरी त्यातील अटींचे पालन केले आहे किंवा नाही हे तपासावे लागेल, असे अंधेरी अग्शिशमन केंद्रातील अधिकारी के. डब्ल्यू. डुंडगेकर यांनी सांगितले.
हेही वाचा >>>ठाण्यात मियावॉकी तंत्रज्ञानाद्वारे वनराई फुलविण्याचे नियोजन ;शहरातील आठ जागांची पालिकेने केली निवड
या ठिकाणी परवानगी न घेता बेकायदा शेड उभारण्यात आली होती, ती पाडण्यात आली. या कारवाईनंतर अर्जदाराने नव्याने अर्ज करून चित्रीकरणासाठी तात्पुरती शेड उभारण्याची परवानगी मागितली. पालिकेच्या धोरणानुसार, छाननी करून तात्पुरती शेड उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे – डॉ. पृथ्वीराज चव्हाण, सहायक पालिका आयुक्त, के पश्चिम विभाग