मालवणीजवळच्या धारवली गावात एका झुडपात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना मिळाला. हायपाय बांधून मृतदेह गोणीत भरून झुडपात टाकण्यात आला होता. महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. १० ते १५ दिवसांपूर्वी मृतदेह टाकण्यात आला असावा, असा अंदाज होता. अर्थात ओळख पटेल असे काहीही सापडले नाही. त्यामुळे मालवणी पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांतील हरविलेल्या व्यक्तींच्या नोंदवहीतून काही तपशील मिळतो का, हे तपासण्यास सुरुवात केली.
मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व गुन्हे अन्वेषणातील माहीर अधिकारी मिलिंद खेतले यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. मृतदेह ज्या गोणीत भरण्यात आला होता त्याची बारकाईने पाहणी केली. ‘आरएसएफ’ असे अत्यंत बारीक अक्षरांत गोणीवर लिहिल्याचे आढळले. आरएसएफ म्हणजे काय, याचा शोध सुरू झाला. मढ वा आसपासच्या परिसरात सुक्या मासळीचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अशा गोणीचा वापर होतो का, याची माहिती काढण्यास सुरुवात झाली. तब्बल ६०-७० व्यापाऱ्यांकडे चौकशी केली असता ‘आरएसएफ’मागील गूढ उकलले. आरएसएफ म्हणजे ‘रिलायबल सी फूड’ ही कंपनी. सुक्या मासळीचा व्यापार करणारी ही कंपनी. त्यामुळे या कंपनीच्या मढमधील कार्यालयात पोलीस गेले. तेव्हा आरएसएफ लिहिलेल्या असंख्य गोण्या इतस्तत: पडून होत्या. यापैकी एखादी गोणी कुणी उचलली तरी लक्षात येणार नाही, असे निदर्शनास आले. तरीही पोलिसांचे एक पथक माहिती काढत होते. परंतु काहीही हाती लागत नव्हते.
मालवणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या हरविलेल्या व्यक्तींच्या नोंदवहीत एक २२ वर्षांची तरुणी हरविल्याची तक्रार तिच्या पतीने दिली होती. रुबी कुरेशी असे या हरविलेल्या महिलेचे नाव होते. परंतु मिळालेला मृतदेह रुबी कुरेशी हिचाच असल्याबाबत काहीही दुजोरा मिळत नव्हता. रुबीचा मोठा दीर मात्र आपण तिला एका अज्ञात व्यक्तीसोबत पाहिल्याचे सांगत होता. जेव्हा त्याला मृतदेहाची छायाचित्रे तसेच त्यावरील कपडे दाखविले असता ती रुबी नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे हा मृतदेह नेमका कोणाचा असा प्रश्न खेतले यांना पडला.
अखेर छायाचित्र, एक्स-रे आदी तपशील आंतरराष्ट्रीय पुरातन विद्यातज्ज्ञांकडे पाठवून मृत महिलेचा चेहरा पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय मृताचे वय किती असावे हे तपासण्यासाठी मृतदेह केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला. साधारणत: १८ ते २१ वर्षे वयोगटातील संबधित महिला असावी, असा अहवाल मिळाला. पुनíनर्माण तंत्रातही साधारणत: रुबीशी साधम्र्य वाटत होते. त्यामुळे मालवणी पोलीस ठाण्यात हरविलेल्या व्यक्तींच्या वहीत नोंद असलेली रुबी हीच नव्हे ना, अशी शंका पोलिसांना वाटू लागली. त्यामुळे रुबी राहात असेलल्या ठिकाणी पोलीस पथक पोहोचले. परंतु तिचे कुटुंबीय घर सोडून उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती मिळाली.
पोलीस पथकाने गोपनीय पद्धतीने रुबीच्या कुटुंबीयांचा उत्तर प्रदेशातील पत्ता शोधून काढला. रुबीची आई गुलिस्तान आणि पती आझाद कुरेशी याची माहिती मिळाली. खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेशकुमार ठाकूर, साहाय्यक निरीक्षक अमृत पवार, संदीप ऐदाळे, उपनिरीक्षक संदीप पंचगणे, अवधूत वाडीकर आदींचे पथक उत्तर प्रदेशात पोहोचले. छायाचित्र आणि कपडय़ांवरून हा मृतदेह रुबीचाच असल्याची ओळख लगेच पटली. परंतु रुबीचा दीर म्हणविणाऱ्या इसमाने ओळख पटविण्यास नकार का दिला होता, याची चक्रे खेतले यांच्या डोक्यात सुरू झाली होती.
अधिक चौकशीत माहिती मिळाली की, रुबी पठाण होती आणि तिचे आझादसोबत प्रेमसंबंध जुळले. परंतु कुरेशी ही खालची जात होती. त्यामुळे या विवाहाला त्यांना घरून मान्यता नव्हती. परंतु तरीही त्याला न जुमानता तिने विवाह केला होता. मोठा दीर रईस याच्यासोबत तिचे नेहमी खटके उडत असत. त्यावेळी कुरेशी ही खालची जात असल्यावरून रुबी त्याला हिणवत असे. त्यामुळे तो संतप्त झाला होता, अशी माहिती मिळाली आणि रईसवरचा संशय बळावला. पोलिसांनी रईसला चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा तो विसंगत उत्तरे देऊ लागला. रुबीच्या मृतदेहाची ओळख का पटविली नाहीस, असे विचारल्यावरही तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच मात्र तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने रुबीच्या हत्येचा घटनाक्रम उलगडून सांगितला.
पती कामावर गेल्यानंतर रईस घरात शिरला आणि एकटय़ाच असलेल्या रुबीला अन्य दोघांच्या मदतीने ठार मारले. इतकेच नव्हे तर मृत रुबीवर रईसने बलात्कारही केला. त्यानंतर दोन गोण्यांमध्ये तिचा मृतदेह भरून तो धारवली गावातील झुडपांमध्ये टाकून दिला. आझाद घरी आला तेव्हा त्याच्यासमवेत तो मालवणी पोलीस ठाण्यात रुबी हरविल्याची तक्रार करण्यासाठीही गेला. प्रत्येक वेळी तो पोलिसांना रुबीविषयी खोदून खोदून विचारत होता. आता रईससह त्याचे अन्य दोन साथीदारही तुरुंगाची हवा खात आहेत.
निशांत सरवणकर -nishant.sarvankar@expressindia.com
TWITTER – @ndsarwankar
तपासचक्र : चेहरा पुनर्निर्माण तंत्राची कमाल
मालवणीजवळच्या धारवली गावात एका झुडपात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना मिळाला.
Written by निशांत सरवणकर

First published on: 16-08-2016 at 03:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malvani woman murder story