पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर झालेली बैठक आणि त्यानंतरची पत्रकार परिषद याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, त्याआधी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भेट घेतली होती. या भेटीविषयी मात्र तुरळक चर्चा होताना दिसत आहे. या भेटीत नेमकं काय झालं? ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याविषयी फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र, या भेटीच्या वेळी घडलेला एक प्रसंग आता त्यांच्यासोबत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कथन केला आहे.
ममता बॅनर्जींनी केली आदित्य ठाकरेंकडे ‘ही’ मागणी
ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरे यांच्यात बैठकीमध्ये काय चर्चा झाली, हे सांगतानाच संजय राऊतांनी त्यानंतर शेवटी घडलेला प्रसंग सामनातील रोखठोक या आपल्या सदरात सांगितला आहे. त्याआधी बैठकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरेंकडे मुंबईत एका भूखंडाची मागणी केली आहे. “मुंबईत पश्चिम बंगालमधून लोक उपचारांसाठी येतात. विशेषत: परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. पश्चिम बंगालला एखादा भूखंड मिळाला, तर तिथे बंगाल भवन उभारता येईल आणि अशा गरजूंची व्यवस्था करता येईल”, अशी मागणी ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केल्याचं संजय राऊतांनी लेखात म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंचं केलं कौतुक
ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतुक केल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. “तुमच्या कामाची मी सतत माहिती घेत असते. खूप चांगलं काम करताय तुम्ही. तुमच्याकडे पर्यटन विभाग आहे. बंगाल, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत पर्यटनाची देवाण-घेवाण वाढायला हवी. पश्चिम बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाकडे महाराष्ट्रातील पर्यटनाचा ओघ आहे. तो वाढला पाहिजे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले बंगाली जनतेस आकर्षित करतात”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्याचं राऊतांनी नमूद केलं आहे.
“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…”, संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका!
ममता बॅनर्जी लिफ्टजवळ येऊन म्हणाल्या…
दरम्यान, या लेखात संजय राऊतांनी ममता बॅनर्जी आदित्य ठाकरेंना लिफ्टपर्यंत सोडायला आल्याचं लिहिलं आहे. “आदित्य ठाकरेंना निरोप देण्यासाठी त्या हॉटेलच्या लिफ्टपर्यंत चालत आल्या. तेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांना नम्रपणे थांबवलं, तरीही त्या आल्या. तुम्ही तरुणांनी आता राजकारणाची सूत्र हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठिशी राहील. मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारण करत आहे. तरुणांची शक्ती मला माहिती आहे. तुम्हीच आता पुढे यायला हवं”, असं ममता बॅनर्जी आदित्य ठाकरेंना म्हणाल्याचं संजय राऊतांनी नमूद केलं आहे.
यूपीए मान्य नसणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावं, पडद्यामागून गुटरगूं करू नये – शिवसेना
ममता बॅनर्जींनी दिलेली ‘ती’ भेटवस्तू!
दरम्यान, ममता बॅनर्जींनी या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांना रवींद्रनाथ टागोरांनी शिवरायांवर लिहिलेल्या एका कवितेची फोटोफ्रेम भेट दिल्याचं राऊतांनी सांगितलं. या कवितेच्या ओळी भाषांतरीत करून देखील त्यांनी दिल्या आहेत:
अनेक शतकांपूर्वी,
माझ्या ध्यानीमनी नसताना,
अगदी कल्पनेपलीकडे
ओबडधोबड दऱ्या-खोऱ्यांत
जिथे सूर्याची किरणे पोहोचत नाहीत
अशा घनदाट अरण्यात
सार्वभौम शिवराय,
आपल्या मस्तकावर एका विजेसारखा अवतीर्ण झाला,
तेजस्वी विचारांच्या किरणांनी
जग उजळून निघाले,
धर्माच्या सूत्रांनी तडे गेलेल्या,
वाट चुकलेल्या या भारताला
मी अखंड करीन…
भाजपा मुख्यमंत्र्यांनी काय केलं?
दरम्यान, संजय राऊत यांनी या लेखात भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्याची देखील आठवण करून दिली. “ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर टीका करणारे भाजपा नेतृत्व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मुंबईतील हालचालींवर आक्षेप घ्यायला तयार नाही. ममतांच्या पाठोपाठ गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल त्यांचं अर्धं मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईतल्या उद्योगपतींना गुजरातचं निमंत्रण देण्यासाठी ते आले. आत्मनिर्भर गुजरात उभारण्यासाठी त्यांना मुंबईतील उद्योगपतींची मदत हवी. खुंटा बळकट करण्यासाठीच मुख्यमंत्री पटेल इथे अवतरले असंच भाजपाचं मत असायला हवं”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.