अवघ्या काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्याआधी ममता बॅनर्जी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यासाठी सज्ज होत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून यात शरद पवारांच्या भेटीचं देखील नियोजन करण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी नव्या आघाडीच्या तयारीत तर नाही ना? अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याचेच संकेत ममता बॅनर्जी यांनी आज मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये बोलताना दिले!

वाय. बी. सेंटरमध्ये चर्चासत्र

ममता बॅनर्जींनी मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. या चर्चेमध्ये बोलताना भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीचे त्यांनी संकेत दिले आहेत. वाय. बी. सेंटरमध्ये ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या चर्चेमध्ये स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा समावेश होता. या चर्चेदरम्यान राजकीय मुद्द्यांवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या पराभवाचा फॉर्म्युला सांगतानाच भाजपाविरोधी आघाडीचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिले.

भाजपाला पराभूत करायचं असेल तर..

देशात भाजपाला पराभूत करायचं असेल, तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. “जर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपाला पराभूत करणं सोपं आहे”, असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी नमूद केलं.

“तुम्ही सातत्याने मैदानात उतरून भाजपासोबत लढत राहायला हवं. नाहीतर ते तुम्हाला बाहेर ढकलून देतील. पश्चिम बंगालमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाही मला बाहेर पडावं लागलं. जेणेकरून इतरही (प्रादेशिक पक्ष) बाहेर पडतील आणि राजकारणात स्पर्धा तयार होईल”, असं देखील त्यांनी नमूद केलं.

राष्ट्रीय आघाडीची तयारी?

ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या भेटीचं देखील नियोजन केलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीच्या कारणामुळे ही भेट रद्द करावी लागली. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांनी ममता बॅनर्जी राजस्थानच्या दौऱ्यावर देखील जाणार आहेत. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी याआधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर तृणमूल काँग्रेसला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात आहे. तसेच, २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांची मोट बांधायला त्यांनी सुरूवात केल्याचा तर्क त्यांच्या भेटीगाठींवरून लावला जात आहे.

Story img Loader