पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाप्रणित एनडीएच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी बैठक पार पडणार आहे. इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक आहे. याआधीच्या दोन बैठका अनुक्रमे बिहारच्या पाटणा आणि कर्नाटकमधील बंगळुरु या शहरांमध्ये पार पडल्या आहेत. इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीला अद्याप सुरुवात व्हायची आहे, त्याआधीच पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून तीन नावं समोर आली आहेत. सर्वात पहिलं नाव चर्चेत आहे ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं. त्यानंतर काही तासातच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचंही नाव चर्चेत आलं आहे. तर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचंही नाव चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणूक एनडीए विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढणार आहे. परंतु, विरोधकांच्या इंडियाचं नेतृत्व कोण करणार? त्यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? हे अद्याप ठरलेलं नाही. दरम्यान, इंडियाच्या बैठकीसाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून नेतेमंडळी मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या आज दुपारी मुंबईत दाखल झाल्या. बॅनर्जी यांनी काही वेळापूर्वी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

ममता बॅनर्जी यांना पत्रकारांनी विचारलं, केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत कमी केली आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? या प्रश्नावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, किंमत कमी केली परंतु किती वाढवलेली ते माहिती आहे ना? त्यांनी आधी भरमसाठ किंमत वाढवली आणि आत्ता निवडणूक आल्यावर किंमत कमी केली आहे. त्यांनी ८०० रुपये वाढवले आणि आता २०० रुपये कमी केले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या आपण दुकानात एखादी वस्तू घ्यायला जातो तेव्हा दुकानदार मुद्दाम जास्त किंमत सांगतो, आपण १०० रुपये कमी करा म्हटल्यावर तो २५ रुपये कमी करतो, हे अगदी तसंच आहे. आधी किंमत वाढवायची आणि निवडणूक आली की त्यात थोडीशी घट करायची. आपल्या देशात गरीब कुटुंबं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना ८०० रुपये किंवा ९०० रुपयांचा गॅस परवडत नाही.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 : तू तिकडे बघ मी फोटो काढतो! ‘प्रज्ञान’ने ‘विक्रम’चं चंद्रावर केलेलं फोटोशूट पाहून व्हाल खूश

यावेळी ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आलं की, इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, इंडिया आघाडी हीच पतप्रधानपदाचा चेहरा असेल. आम्ही यासाठी केवळ इंडियाकडे पाहतोय.