मुंबई : मरीन लाईन्स येथे नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वाराला थांबवल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. आरोपीने रायटर कक्षातील संगणक डोक्यावर मारून घेऊन स्वतःला दुखापतही करून घेतली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार उमेश उगलमुगले शुक्रवारी मरीन लाईन्स येथील आयकर भवन येथे नाकाबंदीसाठी तैनात होते. त्यावेळी तेथे डेन्झिल जॉनी पांगे (३०) दुचाकीवरून आला. उगलमुगले यांनी दुचाकी थांबविण्यास सांगितल्याने डेंन्झिल संतापला. डेन्झिलने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे उगलमुगले त्याला घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात आले. डेन्झिलने तेथेही त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. डेन्झिलने आझाद मैदान पोलीस ठाण्यातील रायटर कक्षातील सीपीयू खाली पाडला व डेक्सटॉप स्वतःच्या डोक्यावर मारून घेतला. त्यामुळे त्याच्या डोळ्यावर दुखापत झाली. आरोपी दारूच्या अंमलात असताना दुचाकी चालवत असल्याचा संशय आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.