सहा वर्षापूर्वी बायको आणि काही नातेवाईकांनी त्याला घराबाहेर काढून हॉटेलमध्ये राहण्यास भाग पाडले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयात या व्यक्तीला आता त्याच्या दोन खोल्यांच्या घरात राहण्याची परवानगी मिळाली आहे.    
न्यायमूर्ती एफ.एम.रेझ आणि वी.एम.कानडे यांनी दिलेल्या एका निर्णयानुसार सदर व्यक्तीला त्याच्या वांद्रे येथील ७०० फुटांच्या घरातमध्ये एका खोलीत त्याची बायको आणि दुस-या खोलीत त्याला राहण्याची परवानगी मिळाली आहे.
न्यायमूर्तींनी त्याच्या पत्नीला पुढील दोन आठवड्यांमध्ये घराची एक चावी पतीला देण्यास सांगितले असून गुण्यागोविंदाने नांदण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने या व्यक्तीला स्वयंपाकघर आणि बाथरूम वापरण्याची परवानगी दिली असून घरातील इतर गोष्टी दोघांनाही वापरण्यास सांगितले आहे. दरम्यान पत्नीने याविरोधात याचिका दाखल केली होती परंतू न्यायलयाने ती याचिका फेटाळून लावली आहे.
पतीच्या म्हणण्यानुसार, २२ जुलै २००७ रोजी आपल्या पत्नीने काही नातेवाईकांच्या मदतीने आपल्याला घराबाहेर पडण्यास भाग पाडले होते. त्यानंतर त्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा पत्नीच्या भावाने त्याला मारहाण केली. त्याचाच परिणाम म्हणून २००७ पासून ते हॉटेलमध्ये राहत होते.
आपला भाऊ आणि इतर नातेवाईक घरात राहत असल्याचा आरोप पत्नीने फेटाळून लावला आहे. ती म्हणाली माझ्या आईने मला चांगल्या नोकरीला लावले असून तिच्यासोबत मी राहत आहे. मला ब-याचदा मानसिक आणि शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागले, असा आरोपही पत्नीने केला आहे. कुटुंब न्यायालयाने पतीची घटस्फोटाची मागणी फेटाळून लावली आहे. मात्र, सदर घर त्याने लग्नाआधी विकत घेतलेले असल्याने त्याला या घरात राहण्यापासून मज्जाव करता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
        

Story img Loader