मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. शिकवणीवरून एकटीच घरी जात असल्याचे पाहून १७ वर्षांच्या तक्रारदार मुलीवर आरोपीने हल्ला केला आणि सोनसाखळी चोरून पळण्याच्या प्रयत्नात होता. मात्र आसपासच्या नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दहिसर येथे वास्तव्यास असलेली तक्रारदार मुलगी सोमवारी रात्री मेट्रो न्यू लिंक रोड येथील पदपथावरून जात होती. ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर आरोपीने हल्ला केला आणि तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडले. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अमन उमेश गुप्ता (२०) असे अटक आरोपीचे नाव असून तो कांदिवली पूर्व येथील रहिवासी आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असून अद्याप त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदरपाडा मेट्रो स्थानकाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.