मुंबई – जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड छोटा राजन याचा वाढदिवस साजरा केल्याची छायाचित्रे दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रसारीत होत आहेत. याबाबत टिळकनगर पोलिसांनी वाढदिवस साजरा करणारे उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री त्यांना अटक केली आहे.
विविध गुन्ह्यात अटक असलेला छोटा राजन याचा १३ जानेवारीला वाढदिवस होता. चेंबूरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांनी छोटा राजन याचा फोटो असलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. समाजमाध्यमांवर या वाढदिवसाची छायाचित्रे प्रसारीत झाल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल शनिवारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी रात्री पराडकर यांना अटक केली आहे.
हेही वाचा – मुंबई : कर्करोग रुग्णांना मिळणार घराजवळ आरोग्य सुविधा
पराडकर यांना रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना काही अटी शर्तींसह २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे. मालाड पूर्व परिसरात देखील शुक्रवारी अनेक ठिकाणी छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले होते. त्याप्रकरणीही पोलिसांनी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.