लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : लांबपल्ल्याच्या रेल्वेमध्ये एका महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी १९ वर्षीय अटेंडंटला अटक केली. ही घटना २१ फेब्रुवारीच्या रात्री घडली. याप्रकरणी प्रथम ठाणे रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते.
महाविद्यालयीन विद्यार्थिनी मूळची छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी आहे. ती संभाजी नगर येथून मुंबईतील वर्गमित्रांसह पिकनिकला आली होती. ते २१ फेब्रुवारी रोजी देवगिरी एक्स्प्रेसने घरी परतत होती. त्यावेळी रेल्वेमध्ये आरोपीने तरूणीला असभ्यरित्या स्पर्श केला. तिने आरडाओरडा केला असता तिच्या वर्गमित्रांनी आणि सहप्रवाशांनी त्याला पकडले. सीएसएमटीहून रेल्वे आधीच निघाली होती. ठाणे स्थानकात रेल्वे थांबली असता आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दीपक पार्टे असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.