वॉर्डन रोड परिसरातील महिलेला अश्लील दूरध्वनी करून पैशांची मागणी करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या पथकाने बिहारमधील नक्षलग्रस्त परिरात जाऊन अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेला ११ एप्रिलला अनोळखी क्रमांकावरून दूरध्वनी आला होता. आरोपीने अश्लील संभाषण केल्याननंतर पीडित महिलेकडे पैशांची मागणी केली. वारंवार येणाऱ्या या दूरध्वनीमुळे कंटाळून महिलेने तात्काळ गावदेवी पोलिसांकडे धाव घेतली.
हेही वाचा >>> मुंबई: विमानतळावर थांबवण्यात आलेल्या परदेशी नागरिकाचे पलायन
पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनेश सातर्डेकर, पोलीस हवालदार रोहन कोळी, शैलेश कदम, अभिजीत जाधव यांच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. त्यावेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांना तपास केला असता आरोपी पश्चिम बंगाल येथील हावडा परिसरात असल्याची माहिती मिळाली. पण आरोपी वारंवार त्याचे ठिकाण बदलत असल्याचे दिसून आले. पुढे तपासात आरोपी बिहारमधील बेगुसराई येथील साष्टा येथील मूळ गावी राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस पथक तेथे रवाना झाले. आरोपी नक्षलग्रस्त परिसरात राहत असल्यामुळे स्थानिक पोलिसांची याप्रकरणी मदत घेण्यात आली. त्यानंतर आरोपी शिवजीकुमार चंद्रदेव पासवान(२१) याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासणीसाठी त्याला स्थानिक साहेबपूर कमाल पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याचा मोबाईल तपासला असता पीडित महिलाचा क्रमांक त्याच्या मोबाईलमध्ये सापडला. पासवान याच्याकडून गुन्हयात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला. त्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर आरोपीला मुंबईत आणण्यात आले.