मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. पण चित्रपट इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात लिक झाला आहे. या चित्रपटाच्या १८१८ बेकायदा इंटरनेट लिंक सापडल्या होत्या. त्याप्रकारणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर माणिक रांधवन (२६) या तरुणाला पुण्यातील दौंड येथून अटक केली.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या लिंक बेकायदेशीरित्या इंटरवेटवर अपलोड करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंच्या तपासणीत १८१८ बेकायदा लिंक इंटरनेटवर आढळल्या आहेत. त्याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३०८ (३) तसेच कॉपीराईट ॲक्टच्या कलम ५१, ६३, ६५ (अ) सिमेमॅटोग्राफी कायदा ६ (अ) (अ) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ४३ व ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार यांनी तक्रार दिलेल्या १८१८ बनावट लिंक पैकी स्कायमूवी एचडी ही लिंक तांत्रिक तपासात आरोपी सागर रांधवन याने अपलोड केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने चित्रपटाच्या होस्टिंगरकडून स्काय मूवी टेक नावाचे डोमेन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याने स्काय मूवी एचडी टेक या नावाने ॲप तयार केले होते. तेथे पैसे भरून ॲप डाउनलोड करणाऱ्यांना छावा व इतर नवीन प्रदर्शित होणारे चित्रपट पाहता येत होते. आरोपीला शुक्रवारी दौंड येथून अटक करण्यात आली. आरोपीला सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
एकूण १८१८ बेकायदा लिंक
ऑगस्ट इंटरटेन्मेट प्रा. लि. विशेष कार्यकारी अधिकारी (सीईओ) रजत राहुल हकसर (३७) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. या कंपनीला मॅडडॉक फिल्मस प्रा. लि. कंपनीने ॲन्टी पायरसी संस्था म्हणून नियुक्त केले आहे. त्यांनी छावा चित्रपटाच्या बेकायदा वितरणाबाबत तपास केला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांच्या तपासणीत १८१८ बेकायदा इंटरनेट लिंक सापडल्या आहे. त्यामुळे पायरसी कायद्याचा भंग झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी आता सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. कंपनीकडून या बेकायदा लिंकची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.