मुंबई : समभागांमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ६३ वर्षीय महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. राजीव बलदेवराज अदलाखा असे या आरोपीचे नाव असून त्याने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मालाडच्या एव्हरशाईन नगरात वास्तव्यास असलेल्या तक्रारदार महिलेचे दुबईत ब्युटीपार्लर होते. मात्र तो व्यवसाय बंद करून तक्रारदार व त्यांची बहिण मुंबईत परत आल्या होत्या. व्यवसायातून मिळालेल्या पैशांपैकी काही रक्कम त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवली होती. दुबईला वास्तव्यास असताना त्यांनी २०१९ मध्ये मुंबईत सदनिका घेण्यासाठी दुबईतील कंपनीकडून कर्ज घेतले होते. यावेळी तिची कंपनीचा व्यवस्थापक राजीव अदलाखाशी ओळख झाली होती. राजीवने तो शेअर बाजारात काम करीत असल्याचे सांगून त्यांना समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना दरमाह दोन टक्के व्याज देण्याचे आमिष त्याने दाखविले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याला २० मार्च २०१९ रोजी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्याच्या बँक खात्यात नेट बँकिंगच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आली होती. त्यानंतर राजीवने तिला एका खाजगी बँकेचा २५ लाखांचा सुरक्षा ठेवींचा धनादेश दिला होता. चार ते पाच महिने त्याने गुंतवणुकीवर दोन टक्क्याप्रमाणे व्याजाची रक्कम दिली, मात्र नंतर त्याने ही रक्कम देणे बंद केले. विचारणा केल्यानंतर राजीवने शेअर बाजारात मंदी असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे पैसे पाठवता आले नाही, मात्र लवकरच सर्व रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करण्याचे आश्वासन त्याने सदर महिलेला दिले.
हेही वाचा…हिवताप आणि डेंग्यूचे मुंबईत सर्वाधिक रुग्ण, दोन वर्षांत रुग्णसंख्येत मोठी वाढ
मात्र दोन वर्ष उलटल्यानंतरही त्याने व्याजासह मुद्दलाची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्या दोघीही मे २०२१ रोजी दुबईतील कंपनीत राजीवला भेटण्यासाठी गेल्या होत्या. राजीवला कंपनीने कामावरून काढून टाकल्याचे आणि त्यानंतर तो त्याच्या दिल्लीतील घरी निघून गेल्याचे त्यांना समजले. ऑक्टोंबर २०२१ मध्ये त्या दोघीही बहिणी दुबईहून मुंबईत आल्या. त्यांनी पुन्हा राजीवबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याने सुरक्षा ठेव म्हणून दिलेला धनादेश तिने बँकेत जमा केला असता, मात्र तो वटला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून राजीवने फसवणूक केल्याचे लक्षात येताच महिलेने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राजीवविरुद्ध ४२० भादवी सहकलम ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी आरोपी राजीवला अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.