मोबाइलवरून व्यापाऱ्याला मालाची ऑर्डर देऊन नंतर तो माल लंपास करणाऱ्या एका भामटय़ाला पोलिसांनी अटक केली. कमलेश जैन असे त्याचे नाव असून त्याने अनेक व्यापाऱ्यांना गंडविल्याची कबुली दिली आहे.पुरनचंद ऊर्फ कमलेश जैन (४२) याने व्यापाऱ्यांना गंडा घालण्याची नवी पद्धत शोधून काढली होती. आपले ठाण्यात हार्डवेअरचे दुकान आहे, असे व्यापाऱ्यांना सांगत तो त्यांच्याकडून मोठया रकमेचा माल मागवत असे. व्यापाऱ्यांनी टेम्पोत माल पाठविल्यानंतर तो पैसे बँकेत जमा करतो, असे सांगत माल घेऊन पोबारा करीत असे. धर्मेश शहा या व्यापाऱ्याला त्याने अशाच पद्धतीने फसविले होते. माझे महावीर हार्डवेअर नावाचे दुकान असून स्क्रू आणि बोल्टची आवश्यकता आहे असे सांगत सुमारे पाच लाख रुपयांची ऑर्डर त्याने दिली. हा सर्व व्यवहार त्याने केवळ मोबाइलवर केला
होता. शहा यांनी माल असलेला टेम्पो पाठवल्यानंतर त्याने मध्येच ते सामान ताब्यात घेतले. मी याचे पैसे बँकेत भरतो, असे सांगून त्याने सामान उतरवून घेतले. पण बँकेत पैसे जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे शहा यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी पोलिसांनी कमलेश जैन याला दहिसर येथून अटक केली. त्याने अशा स्वरूपाचे किमान ११ गुन्हे केल्याची कबुली दिली.