मुंबई: पवई पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत १३ किलो २१७ ग्रॅम चरस आणि शस्त्रासह एका सराईत आरोपीला अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही अमलीपदार्थ विक्रीचे दोन व सेवनाबद्दल एक गुन्ह दाखल आहे. मुंबईत अमलीपदार्थ विक्रेत्याविरोधात विशेष मोहिम राबवण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक उपायुक्त (परिमंडळ-१०) सचिन गुंजाळ यांनी अमली पदार्थ सेवन व विक्रीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी गुन्हयाच्या वेळा, ठिकाणे, अभिलेखावरील आरोपी तपासणी करण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना केल्या होत्या. त्या माहितीच्या आधारे पवई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शोभराज सरक व त्यांच्या पथकाने पवई परिसरात विशेष मोहिम राबवली. त्यावेळी पवई येथील विहार सरोवराजवळील चांदशहावली दर्गा कंपाउंडच्या बाजुला मोटरगाडी उभी असल्याचे दिसून आले. तपासणी केली असता त्या मोटरगाडीमध्ये मोहम्मद सादिक हनिफ सय्यद (४६) ही व्यक्ती सापडली. तो अमलीपदार्थांचा सराईत विक्रेता आहे. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.
हेही वाचा >>> तीन वर्षांत २४७ अपघात; ‘बेस्ट’च्या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांच्या सर्वाधिक दुर्घटना
मोटरगाडीची तपासणी केली असता सहा किलो ३२ ग्रॅम संशयीत पदार्थ सापडला. त्याची तपासणी केली असता ते चरस असल्याचे निष्पन्न झाले. त्याशिवाय मोटरगाडीतून १८.५ सेमी लोखंडी बॅरल व एक गावठी बनावटीचा कट्टा सापडला. घटनास्थळी पंचनामा करून अमलीपदार्थ व गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर त्याची आणखी चौकशी केली असता त्याच परिसरातील एका खोलीत त्याने आणखी चरस लपवले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने चांदशहावली दर्गा कंपाउंड जवळील एका खोलीतून आणखी ७ किलो १८५ ग्रॅम चरस जप्त केले. याप्रकरणी आरोपी सय्यद विरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा कलम ८ (क) सह २०(ब), २ (क) तसेच भारतीय शस्त्र कायदा कलम ३, २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
हेही वाचा >>> राज्यात प्रथमच ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची १२ महाविद्यालये
याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यांत एकूण १३ किलो २१७ ग्रॅम चरस (किंमत तीन कोटी ३० लाख ४२ हजार ५०० रुपये) एक गावठी कट्टा (किंमत १० हजार रुपये), मोटरगाडी (किंमत चार लाख रुपये) व साडे तीन हजार रोख रक्कम असा एकूण तीन कोटी ३४ लाख ५५ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी सराईत असून यापूर्वीही त्याच्याविरोधात अंमली पदार्थ विक्रीचे दोन व अंमली पदार्थ सेवनाचा एक गुन्हा दाखल आहे. आरोपीने अमलीपदार्थ कोठून आणले याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.