लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गुन्हे शाखेच्या कक्ष ७ मधील अधिकाऱ्यांनी मुंबईतील जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड परिसरात कारवाई करून ३६ वर्षीय व्यक्तीला शस्त्रास्त्रांसह अटक केली. त्याच्याकडील दोन पिस्तुले व आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपी नवी मुंबईतील रहिवासी असून त्याच्याविरोधात भारतीय हत्यारबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

मुन्ना राजबली दुबे (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नवी मुंबईतील कोपर खैराणे परिसरात राहतो. जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड परिसरातील पवार वाडी येथे एक संशयीत शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष-७ मधील पोलिसांनी परिसरात सापळा रचला होता. या परिसरात संशयीतरित्या फिरणाऱ्या दुबेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली दोन पिस्तुले, चार मॅगझीन व आठ जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याविरोधात भारतीय हत्यारबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-रेल्वे आणि मेट्रोचे सीएसएमटी स्थानक भुयारी मार्गाने जोडले जाणार

याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष-७ मधील पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी नेमक्या कोणत्या कारणासाठी येथे शस्त्र घेऊन आला होता याबाबत तपास सुरू आहे. दुबेच्या चौकशीत अन्य संशयीत आरोपींची माहिती मिळाली असून त्याबाबत गुन्हे शाखेतील पोलीस अधिक तपास करीत आहेत.