मुंबई : पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून एकाने दोन मित्रांवर चाकूने हल्ला केल्याची घटना चार दिवसांपूर्वी भांडूप परिसरात घडली आहे. याबाबत भांडूप पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
प्रथमेश मौर्या (२४) आणि संतोष मिजार (२४) असे यातील जखमी तरुणांची नावे असून दोघेही भांडुपच्या श्रीराम पाडा परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी संतोष याच्या आई-वडीलांना आरोपी साहिल सिंह (२२)याने त्रास दिला होता. याबाबत दोन्ही मित्रांनी भांडूप पोलीस ठाण्यात तक्रार केली. याचाच राग मनात धरून आरोपी दोन्ही मित्रांना धमकावत होता. काही दिवसांपूर्वी तर आरोपीने वाद मिटवण्यासाठी दोन्ही मित्रांकडे पैशाची देखील मागणी केली होती. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. याच दरम्यान १३ तारखेला दोन्ही मित्र परिसरातून जात असताना त्याने दोघांना मारहाण करत, त्यांच्यावर चाकूने वार केले.
हेही वाचा…निवासी डॉक्टर आक्रमक, सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने ‘मार्ड’चा आंदोलनाचा इशारा
त्यात दोघांना गंभीर दुखापत झाली असून स्थानिकांच्या मदतीने त्यांना मुलुंडच्या आगरवाल रुग्णालयात दाखल केले आहे. भांडुप पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.