मुंबईः दहिसर येथील एका व्यावसायिकाची अज्ञात आरोपींनी ब्रिटन पोलीस असल्याची बतावणी करून फसवणुकीचा प्रयत्न केला. लंडन येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मुलासह इतर तिघांना बलात्काराच्या गुन्ह्यांत अटक केली असून प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडून ६० हजार रुपये घेऊन आणखी पैशांची मागणी केली. मात्र वेळीच फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यांनतर त्यांनी पैसे पाठविलेल्या बँक खात्यातील व्यवहार थांबवले. तसेच दहिसर पोलिसांनी ६० हजार रुपये रक्कम गोठवली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञाना प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> १.४५ टन प्लास्टिक जप्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
दहिसर परिसरात कुटुंबासमवेत वास्तव्यास असलेल्या तक्रारदारांचा मुलगा लंडन येथे नोकरीला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तो लंडनमधील पोलीस बोलत असल्याचे सांगितले. लंडन येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला असून लंडन पोलिसांनी या गुन्ह्यांत चार आरोपींना अटक केली होती. त्यात तक्रारदारांच्या मुलाचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत चारही आरोपी कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. या चौघांनी पीडित तरुणीवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. हे ऐकताच तक्रारदारांना मानसिक धक्का बसला. त्यांनी त्यांच्या मुलाची चौकशी करून त्याच्याशी बोलणे करून द्या, अशी विनंती केली. मात्र या व्यक्तीने त्यांच्या मुलाशी बोलणे करून देण्यास नकार दिला आणि प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. कुठलीही शहानिशा न करता त्याने दिलेल्या बँक खात्यात तक्रारदारांनी ६० हजार रुपये पाठवले.
हेही वाचा >>> हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा
काही वेळानंतर त्याने तक्रारदारांबरोबर त्यांच्या मुलाचे बोलणे करून दिले. फोनवर बोलणारा मुलगा सतत रडत होता. पैसे देऊन प्रकरण मिटवून बाहेर काढण्याची विनंती करीत होता. मात्र तक्रारदाराने गुजरातीमध्ये संभाषण केल्यानंतर त्याने दूरध्वनी बंद केला. सुरुवातीला त्यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. मात्र मुलाविषयी माहिती ऐकून त्यांना काहीच सुचत नव्हते. काही वेळानंतर त्यांना दुसऱ्या व्यक्तीने दूरध्वनी केला. ती व्यक्ती तक्रारदारांबरोबर हिंदीतून संभाषण करीत होती. यावेळी तक्रारदारांनी हिंदीतून बोलणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने त्यांना त्यांची भाषा समजावी म्हणून एका भारतीय व्यक्तीची मदत घेतल्याचे सांगितले. या व्यक्तीने त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली. दीड लाख रुपये दिल्यास त्यांच्या मुलाला या प्रकरणातून बाहेर काढण्यात येईल, असे तक्रारदारांना सांगण्यात आले. मात्र तक्रारदारांनी दीड लाखाऐवजी ७५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या मुलाला दूरध्वनी करून शहानिशा केली. मात्र त्यांचा मुलगा घरीच झोपल्याचे समजले होते. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी दहिसर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तक्रारदाराने ६० हजार रुपये जमा केलेले बँक खाते गोठविण्यात पोलिसांना यश आले. आरोपींनी आर्टिफिशल इंटेलिजन्स टुल्सच्या माध्यमातून हा फसवणुकीचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा प्रयत्न फसला.