दादरमध्ये पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरूवारी घडला. घटनास्थळावरून मिळालेल्या चिठ्ठीमध्ये पत्नीची हत्या करून आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कर्जबाजारीपणामुळे कंटाळून पतीने हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपास निष्पन्न झाले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा >>> एक एकरवरील पुनर्विकास : म्हाडाला घरे की अधिमूल्य? दीड वर्षांनंतरही धोरण जाहीर करण्यास टाळाटाळ
दादरच्या सेनापती बापट मार्गावरील केशरी पत्रावाला चाळीमध्ये विनोद वसंत समजीस्कर (४३) हे पत्नी शुभांगी (४०) आणि मुलीसोबत राहण्यास होते. ते खासगी कंपनीत नोकरी करीत होते. तर पत्नी गृहिणी होत्या. त्यांची मुलगी अकरावीत आहे. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मुलगी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी बाहेर पडली. गुरुवारी दुपारच्या सुमारास शुभांगी दूरध्वनी उचलत नसल्याने त्यांच्या भावाला संशय आला. त्यांनी, जवळच्या नातेवाईकाला घरी जाऊन बहिणीशी बोलणे करून देण्यास सांगितले. मात्र, घराचा दरवाजा बंद होता. आतूनही काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना संशय आला. मुलगी घरी आल्यानंतर दोघेही बेशुद्धावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांच्याजवळ मिळालेल्या चिठ्ठीमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नीची हत्या करून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते. घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पत्नीचा मृत्यू विषामुळे झाला का हे वैद्यकीय अहवालनंतरच स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई विमानतळावरून उद्यापासून दक्षिण मुंबई, नवी मुंबईसाठी प्रीमियम बस सेवा सुरू
मृत्युपूर्वी पतीने लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नीची हत्या करून आत्महत्या करीत असल्याचे नमुद केले आहे. पती-पत्नीमध्ये भांडण होत होते का, त्यांनी कर्ज घेतले होते का याबाबत कोणतीही माहिती शेजारी अथवा नातेवाईकांना नाही. त्यामुळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.